… तोपर्यंत ‘अगस्ति’च्या कार्यकारी संचालकांचा राजीनामा मंजूर करु नये! शेतकरी नेते दशरथ सावंत आणि बी. जे. देशमुख यांची पत्रकार परिषदेत मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ति कारखान्याच्या कारभाराबाबत सभासदांनी उपस्थित केलेले प्रश्न व शंकांची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांचा राजीनामा संचालक मंडळाने मंजूर करु नये. या आशयाची मागणी सभासदांच्यावतीने ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत आणि सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बी. जे. देशमुख यांनी केली आहे.

याविषयी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेवानिवृत्त अधिकारी बी. जे. देशमुख म्हणाले, विरोधक त्रास देतात म्हणून कार्यक्षम कार्यकारी संचालकांनी राजीनामा दिला असे काही संचालक म्हणतात. माझी आत्मप्रौढी म्हणून नाही पण बंद पडलेल्या अनेक संस्था मी सक्षमस्थितीत आणल्या. उलट चालू असलेल्या कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा देऊन दुसर्‍यांना दोष देणे किंवा आपल्यावरील आरोपांच्या चौकशीपूर्वीच राजीनामा देणे हा कार्यक्षमपणा नाही.

ऊस उत्पादकांचे 24 कोटी, कारखाना कामगारांचे 6 कोटी आणि उसतोडणी कामगारांचे 5 कोटी असे मिळून जवळपास 35 कोटींचे तातडीचे देणे थकले आहे. अनेकदा माहिती मागूनही आजपर्यंत केवळ एकदा माहिती मिळाली. तर कारखान्यांशी तुलना करुन सर्वच कारखान्यांवर कर्ज असल्याचा दाखला सत्ताधारी देतात. परंतु त्यांची मालमत्ता, कर्ज, त्या तुलनेत अगस्तिची मालमत्ता आणि त्यावरील कर्ज हा लेखाजोखा सभासदांपुढे मांडला जात नाही. अगस्तिनंतर चालू झालेले अनेक साखर कारखाने सक्षमरित्या चालू असून अशांची माहिती मात्र अगस्तिच्या सभासदांपर्यंत पोहोचत नाही.

तर ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत म्हणाले, विरोधकांमुळे कार्यकारी संचालकांनी राजीनामा दिला ही आवई उठविली जाते ती धादांत खोटी आहे. चालू हंगाम संपल्यानंतर शेतकर्‍यांची, कामगारांची, उसतोडणी मजुरांची किती देणी आहेत याची माहिती द्यावी आणि आगामी गळीत हंगामाचे नियोजन संचालक मंडळ कसे करणार? या प्रश्नांच्या उत्तरासाठी आम्ही कारखान्यावर गेलो होतो. वास्तविक कारखान्याने आपली माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर टाकली तर तिथे जाण्याचे कारणही उरणार नाही. परंतु कारखाना सक्षमपणे चालून सभासद आणि उस उत्पादकांच्या हितासाठी आमचा पाठपुरावा आहे. अगस्ति कारखान्यावर झालेले आरोप हे विद्यमान कार्यकारी संचालकांच्या कार्यकाळात झालेले आहेत. या प्रश्नांची तड लागल्याशिवाय कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळानेही त्यांना सोडू नये. कार्यकारी संचालकांचा राजीनामा नामंजूर करुन सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवीत असेही सावंत यांनी सांगितले.

Visits: 8 Today: 1 Total: 80188

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *