नेवासा तालुक्यात रेमडेसिविरची अवैध विक्री करताना दोघांना पकडले स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एकेक करत साखळीच उलगडली


नायक वृत्तसेवा, नेवासा
सध्या रेमडेसिविर इंजेक्शनची साखळी पद्धतीने विक्री सुरू असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. याचे लोन केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही पसरलेले असल्याचे दिसून येत आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नेवासा तालुक्यात दोघांना पकडले आणि तेथून साखळीच उलगडत गेली. आत्तापर्यंत चौघे पोलिसांच्या हाती लागले आहेत, एकजण फरारी असून मुख्य सूत्रधाराचा ठावठिकाणा अद्याप बाकी आहे. काळाबाजार थोपविण्यासाठी नियम कडक करून सध्या जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली आणि केवळ रुग्णालयांत या इंजेक्शनचा पुरवठा होत असताना ती बाहेर येतातच कशी? हा प्रश्नही अद्याप अनुत्तरीत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (ता.10) सकाळपासून धावपळ करीत ही कारवाई केली आहे. आत्तापर्यंत चार आरोपी हाती लागले असून त्यांच्याकडून सहा इंजेक्शनसह 11 लाख, 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, नेवासा तालुक्यात काहीजण या इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री करीत आहेत. त्यानुसार त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अशोक राठोड आणि आपल्या पथकाला घेऊन सापळा रचला. बनावट ग्राहकामार्फत संशयितांशी संपर्क साधला. त्यांनी ग्राहकाला नगर-औरंगाबाद रस्त्यावरील एका हॉटेलसमोर येण्यास सांगितले. त्यानुसार बनावट ग्राहक आणि पोलिसांनी तेथे जाऊन सापळा रचला. एका इंजेक्शनची किंमत आरोपींनी 35 हजार रुपये सांगितली होती. ते घेण्याची तयारी दर्शविताच आरोपी समोर आले.

रामहरी बाळासाहेब घोडेचोर (वय 22, रा.देसवडे, ता.नेवासा) व आनंद कुंजाराम धोटे (वय 28, रा.भातकुडगाव, ता.शेवगाव) यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन हस्तगत करण्यात आली. चौकशीत त्यांनी ही पंकज खरड (रा.देवटाकळी, ता.शेवगाव) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने खरड याचा शोध घेऊन त्याला पकडले. त्याच्याकडेही एक इंजेक्शन आढळून आले. त्याच्याकडील चौकशीत त्याने हे इंजेक्शन सागर तुकाराम हंडे (वय 30, रा.खरवंडी, ता.नेवासा) याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी लगेच हंडे याचा शोध सुरू केला. तो वडाळा बहिरोबा गावात बसस्थानकाजवळ आढळून आला. त्यालाही पकडण्यात आले. त्याच्याकडून दोन इंजेक्शन आढळून आली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने ती हेमंत राकेश मंडल (रा.वडाळा, ता.नेवासा) याने विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्याच्याकडे आणखी साठा असून तो ती आपल्या कारच्या डॅशबोर्डमध्ये ठेवतो अशी माहितीही हंडे याने पोलिसांना दिली. आता पोलिसांना मंडल हवा होता. त्यामुळे पोलिसांनी हंडे यालाच त्याच्याच मोबाइलवरून मंडल याला फोन करण्यास सांगितले. त्यावर त्याने आपण नेवासा फाटा येथे असल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने तिकडे धाव घेतली. त्याचा शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. मात्र, तेथील राजमुद्रा चौकात त्याची कार उभी होती. हंडे याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारची झडती घेतली असता डॅशबोर्डमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन आढळून आले.


यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील इंजेक्शन, वाहने आणि मोबाईलही अशा सर्व मिळून 11 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मंडल हाती लागला नाही. त्यामुळे त्याच्याकडे इंजेक्शन कोठून आली, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. औषध निरीक्षक राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरारी आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी आपल्या पथकासह ही मोहीम राबविली. सोमनाथ दिवटे, मिथून घुगे, गणेश इंगळे, सुरेश माळी, प्रकाश वाघ, शंकर चौधरी, संतोष लोढे, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे, रवींद्र घुगासे, संदीप पवार, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, उमाकांत गावडे या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा पथकात समावेश होता.

Visits: 80 Today: 1 Total: 1113938

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *