लक्षणे दिसताच तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा! शिर्डी येथील आढावा बैठकीत महसूल मंत्र्यांचे नागरिकांना आवाहन


नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. तालुका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनीही या उपाययोजनांमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच, आजाराची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

राहाता व शिर्डी परिसरातील कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली साईसंस्थान सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित प्रशासनातील अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुधीर तांबे, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ.मैथिली पितांबरे आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री थोरात यांनी ऑक्सिजन प्लँट उभारणी, आरटीपीसीआर लॅब उभारणी, कोविड उपचारांसाठी बेडची संख्या वाढविणे, रुग्णांना औषधोपचार व औषधांचा पुरवठा तसेच त्यांना देण्यात येणार्‍या सुविधांचा आढावा घेतला. साईसंस्थानतर्फे चालविण्यात येणार्‍या कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कोविड रुग्णांची मानवतेच्यादृष्टीने सेवा करावी अशी सूचना केली. खासदार सदाशिव लोखंडे यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून कोविडबाधित रुग्णांवर योग्य उपचार करावा अशी सूचना केली. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी रुग्णांशी सौजन्याने वागावे असे सांगितले. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. या बैठकीला तालुका प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, साईसंस्थान रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


शिर्डी येथे सुमारे चार हजार दोनशे बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मान्यतेने आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पुढाकाराने संस्थानच्या ‘जम्बो कोविड सेंटर’ला मान्यता देण्यात येत असून लहान मुलांवरील उपचारांसाठी मोठी सुविधा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोविड उपचाराच्या मुंबई मॉडेलची प्रशंसा केली असून, त्याच धर्तीवर शिर्डी येथे उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

Visits: 122 Today: 1 Total: 1099795

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *