लसीकरणासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटीजेन चाचणी होणार..! वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांचे सर्व लसीकरण केंद्रांना आदेश..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजही तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. त्यातच प्रादुर्भाव वाढल्यापासूनच लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने व लशींचाही तुटवडा असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. आता लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटीजेन चाचणी केल्याशिवाय त्याला लस देण्यात येऊ नये असे आदेशच त्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने संगमनेरच्या तहसीलदारांनीही तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रांना वरील आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत आदेशित केले आहे. या निर्णयामुळे लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी नियंत्रणात येण्यासह लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा अनिर्बंध संचार थांबण्याची शक्यता आहे.
राज्यासह जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू असतानाही कोविड रुग्ण संख्येत कोणतीही घट झालेली नाही. किंबहुना दररोज समोर येणारी रुग्णसंख्या नवनवा उच्चांक गाठीत आहे. आजही एकीकडे जिल्ह्यातील रुग्णसंख्येला सुट्टीचा दिलासा मिळालेला असताना, संगमनेर तालुक्यातून मात्र आजच्या दिवसातील जिल्ह्यातील सर्वाधिक 442 रुग्ण समोर आले आहेत. आज सकाळी प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संवाद साधला. यावेळी लसीकरणा संदर्भात सर्व केंद्रांवर मोठी गर्दी होत असल्याची गोष्ट प्रकर्षाने समोर आल्याने व निर्बंधतही प्रादुर्भाव वाढत असल्याने रॅपिड अँटीजेन चाचणी केल्याशिवाय कोणालाही लस न देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता लस घेण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कोविड चाचणी होणार आहे.
याबाबत संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रांना आदेश बजावले आहेत. त्यानुसार तसे करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आता रॅपीड अँटीजेन चाचणी करुन त्यातून संबंधिताला लक्षणे दिसून आल्यास त्याला लसीकरण केंद्राच्या जवळील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचे, मध्यम अथवा तीव्र स्वरूपाची लक्षणे असल्यास त्यांना कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी होणाऱ्या गर्दीत घट होणार असून लागण झालेली असतानाही आपल्याला काहीच झालेले नाही असे समजून गावभर बोकाळणारे आणि भीतीपोटी लसीकरण केंद्रावर गर्दी करणारे उघड होणार आहेत. यापुढे लस घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चाचणी केली जाणार आहे. त्याशिवाय कोणालाही लस मिळणार नाही. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत दूरदर्शी असून त्याचे सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसांंत समोर येण्याची शक्यता आहे.
Visits: 19 Today: 1 Total: 118586