रोज भेटायला मी सरपंच नव्हे तर खासदार आहे! शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडेंचे टीकेला उत्तर

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे मतदारसंघात अभावानेच दिसतात आणि लोकांना भेटत नाहीत, अशी त्यांच्याविरूद्ध मागील कार्यकाळापासूनची तक्रार आहे. त्यांच्यावरील या टीकेला त्यांनी नुकतेच थेट उत्तर दिले. ते म्हणाले, ‘गावचे सरपंच लोकांना रोज भेटू शकतात. मी सरपंच नव्हे तर खासदार आहे. रोज भेटत नसलो तरी मतदारसंघासाठी माझी कामे सुरूच असतात.’

कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शिर्डीत आले असता खासदार लोखंडे पत्रकारांशी बोलत होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोखंडे निवडून आलेले असले तरी त्यांचे वास्तव्य मुंबई आणि दिल्लीतच असते. त्यामुळे मागील कार्यकाळापासून ते भेटत नसल्याच्या मतदारसंघातून तक्रारी होत असतात. कोरोनाच्या संकटातही सुरवातीच्या काळात ते भेटायला आले नसल्याची लोकांची तक्रार आहे. यावरूनच नेवासा येथील आढावा बैठकीच्यावेळी त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला होता. या टीकेबद्दल विचारले असता लोखंडे म्हणाले, लोकसभेचे अधिवेशन, इतर बैठका यासाठी वर्षातील सुमारे दोनशे दिवस दिल्लीतच जातात. उरलेल्या काळात मतदारसंघासाठीची कामे सुरू असतात. मी भेटलो नाही, याचा अर्थ काम करीत नाही, असा होत नाही. माझे काम सुरूच असते. गावचा सरपंच रोज भेटू शकतो, मी सरपंच नाही, खासदार आहे. सर्वसामान्य जनतेला हे माहिती आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, असं लोखंडे यांनी म्हटलं आहे.

कोणताही राजकीय वारसा नाही, कोणतेही कारखाने नाहीत, सहकारी संस्था, बँका नाहीत, असे असताना मला या मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून दिले आहे. याच जिल्ह्यातून तीनवेळा आमदारही झालो आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना व राज्य सरकारचे सहकार्य घेऊन विकास कामासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. मतदारांना सतत प्रत्यक्ष भेटणे होत नसले तरी त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी माझे काम सुरूच असते. इतरांप्रमाणे वेळ देऊ शकत नसलो तरीही जेव्हा शक्य होते, तेव्हा जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा माझा प्रयत्न असतो, असेही लोखंडे म्हणाले.

Visits: 278 Today: 1 Total: 1115793

0 thoughts on “रोज भेटायला मी सरपंच नव्हे तर खासदार आहे! शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडेंचे टीकेला उत्तर

  • May 10, 2021 at 3:23 pm
    Permalink

    पाच वर्षात एकदा आले तरी चालेल..
    शेवटी काय आम्हीच निवडून दिले ना..
    आमच्या नशिबाने आम्हाला लोकल प्रतिनिधी नाही मिळाला..
    आता या डायरेक्ट निवडणूक प्रचार ला …
    तेव्हा पण पार्टी-दारू साठी आमचे तरुण कार्यकर्ते असतील तुमच्या दिमतीला…

    काहीतरी आदर्श घ्या त्या पारनेर च्या लोकप्रतिनिधी चा..

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *