गावोगावी लॉकडाऊनचे निर्बंध कडक पद्धतीने राबवा ः थोरात महसूल मंत्र्यांनी चंदनापुरी, आंबी दुमाला व बोटा कोविड सेंटरमधील रुग्णांशी साधला संवाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकसहभाग व प्रशासनाच्या समन्वयातून बोटा व चंदनापुरी येथे झालेले कोविड केअर सेंटर हे इतरांसाठी आदर्शवत असून कोरोना किंवा इतर कोणत्याही आजाराचे लक्षणे असले तरी त्या व्यक्तीला तातडीने स्वतंत्र ठेवा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांचे कडक पालन करणे गरजेचे असून, प्रत्येक गावात तरुणांनी पुढाकार घेत ग्राम आरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम बनवून गावोगावी लॉकडाऊनचे निर्बंध कडक पद्धतीने राबवा, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

तालुक्यातील चंदनापुरी, आंबी दुमाला, बोटा येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधत धीर दिला. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, आर. बी. रहाणे, विजय रहाणे, तुळशीनाथ भोर, सुहास आहेर, सुहास वाळुंज, बाळासाहेब ढोले, विकास शेळके, संतोष शेळके यांसह प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी गावकर्‍यांशी संवाद साधताना मंत्री थोरात म्हणाले, कोरोना हे आपल्या सर्वांवर आलेले संकट आहे. यामध्ये कोणीही निष्काळजीपणा करू नये. कुटुंबातील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली तर संपूर्ण कुटुंब बाधित होते. म्हणून एका व्यक्तीला लक्षणे आढळली तर तातडीने त्याचे विलगीकरण करा. प्रत्येक गावात युवकांनी पुढाकार घेत ग्राम आरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम भरून लॉकडाऊनचे निर्बंध कडक पद्धतीने पाळा. यासाठी अनुशासित समित्या तयार करा. घुलेवाडीमध्ये याबाबत अत्यंत चांगले काम होऊन त्याचे मॉडेल म्हणून अनुकरण करा.

गाव पातळीवर महत्त्वाचे काम हे स्थानिक डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा सेविका, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल व शिक्षक हे अत्यंत चांगले करत आहे. त्यांना घरोघर होणार्‍या तपासणीसाठी सहकार्य करा. संगमनेरमधील सर्व प्रशासन व यशोधन कार्यालय आपल्या सेवेसाठी 24 तास कार्यरत आहे. निष्काळजीपणा हाच सध्या मारक ठरतो आहे. ग्रामीण भागात वाढणारी कोरोणाची रुग्णसंख्या ही चिंताजनक असून येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला ही वाढ पूर्ण थांबवायची आहे. यासाठी प्रत्येकाने जागृतीने काम करा. याचबरोबर रुग्णांची चौकशी करत त्यांना धीर द्या. चंदनापुरी येथील कोविड केअर सेंटर हे शिक्षकांनी सुरू केले असून ज्ञानदान करणार्या शिक्षकांनी केलेले हे समाजहिताचे कार्य इतरांसाठी मार्गदर्शक असल्याचे शेवटी त्यांनी नमूद केले. या भेटीमध्ये मंत्री थोरात यांनी ग्राम आरोग्य सुरक्षा समितीच्या सदस्यांशी संवाद साधून घरोघर तपासणीसाठी येणार्‍या अडचणी समजून घेत काही सूचना केल्या.

Visits: 3 Today: 1 Total: 29678

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *