दूध भेसळ प्रकरणी पाच महिन्यांनी गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील चंडकापूर येथील जयभवानी दूध संकलन केंद्रातील दूध भेसळ प्रकरणी अन्न व औषध प्रशासनातर्फे गुरुवारी (ता.6) राहुरी पोलीस ठाण्यात दूध केंद्राच्या चालकाविरोधात अन्नसुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र चांगदेव जरे (वय 31, रा.चंडकापूर) असे आरोपीचे नाव आहे. नगरच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे व अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांच्या पथकाने 31 डिसेंबर, 2020 रोजी चंडकापूर येथे जय भवानी दूध संकलन केंद्रावर छापा घातला होता. त्यात भेसळीसाठी साठविलेली 25 किलो व्हे पावडर, 152 किलो लिक्विड पॅराफिन व भेसळयुक्त 532 लिटर दूध असा 30 हजार 24 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. भेसळयुक्त दूध जागीच नष्ट करून, दूधसंकलन केंद्राचा परवाना निलंबित केला होता. आरोपी जरे गाईचे 800 लिटर दूध शेतकर्यांकडून रोज खरेदी करून, त्यात 200 लिटर कृत्रिम दूध मिसळून त्याची विक्री करीत होता. छाप्यात जप्त केलेले रसायनांचे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात मानवी शरीराला अत्यंत घातक असलेल्या लिक्विड पॅराफिन या रसायनाची दुधात भेसळ असल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाला. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ तपास करीत आहेत.

भेसळीसाठी रसायने कुठून आणली, या साखळीत कितीजण आहेत याची माहिती आरोपी राजेंद्र जरे सांगत नव्हता. मानवी आरोग्यास घातक दूध भेसळ मुळापासून नष्ट करण्यासाठी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
– संजय शिंदे (सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, नगर)
