… अन् कोरोनाबाधितांच्या मुलांचे आमदार नीलेश लंके झाले मामा! राहुरी तालुक्यातील कुटुंबासह मुलांची भाळवणीच्या कोविड सेंटरमध्ये केली सोय
नायक वृत्तसेवा, राहुरी
कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल बहिणीच्या मुलांचा सांभाळ करण्यास त्यांच्या सख्ख्या मामाने नकार दिला. अशा परिस्थितीत कोठे जावे, हे सूचेनासे झालेल्या राहुरी तालुक्यातील कुटुंबाने पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्याशी संपर्क केला. लंके यांनी त्या महिलेला आणि तिच्या पतीला उपचारासाठी आपल्या कोविड केअर सेंटरमध्ये बोलावून दाखल करून घेतले आणि त्यांच्या मुलांचा मामाप्रमाणे सांभाळ सुरू केला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे सख्ख्या मामाने नाकारलेल्या भाच्यांना आमदार मामा मिळाला.
राहुरी तालुक्यातील एका कुटुंबातील एका दाम्पत्याला कोरोनाची बाधा झाली. त्यांना दोन लहान मुले आहेत. स्वत: उपचारासाठी दाखल व्हायचे असल्याने त्या काळात या मुलांना कोठे ठेवायचे? असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे महिलेने आपल्या भावाला फोन केला. आम्ही दोघेही कोरोनाबाधित झालो असून उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे. आमच्या मुलांना तुमच्याकडे घेऊन जा, अशी विनंती बहिणीने भावाला केली. मात्र, कोरोनाच्या भीतीने मामाने यासाठी नकार दिला. कोरोनाचा संसर्ग होईल, त्यामुळे तुझी तु त्यांची व्यवस्था कर, असे उत्तर भावाकडून मिळाले.
याची माहिती मिळाल्यावर आमदार लंके यांनी या कुटुंबाला आधार दिला. तुम्ही भाळवणीच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्या. तुमच्या दोन्ही मुलांची जबाबदारी माझी, असे म्हणून सेंटरमध्ये ज्याठिकाणी कार्यकर्त्यांचा राबता असतो त्याठिकाणी दोन स्वतंत्र बेड लावून दोन्ही लहानग्या भावा-बहिणींची सोय केली. स्वत: आमदारही त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. रुग्णांची काळजी घेण्यासाठी लंके यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची सेवा तर अगत्यपूर्वक केली जातेच, आता त्यांच्यासोबतच्या लहान मुलांना सांभाळण्याचे हे एक उदाहरण लंके यांनी दाखवून दिले. कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर अंगावरील कपड्यानिशी राहुरीचे हे दाम्पत्य कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले. त्यांच्या मागे मुलांची सोय होत नव्हती. तीही झाल्याने या दाम्पत्याने समाधान व्यक्त केले आहे. त्यांची प्रकृती सुधारत असून लवकरच त्यांना येथून डिस्चार्ज मिळणार आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढला तशा माणुसकी हरवत चालल्याच्या घटनाही ऐकू येत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबाकडे आप्तस्वकीय पाठ फिरवत आहेत. मात्र, एक लक्षात ठेवले पाहिजे आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे माणुसकीला नाही.
– नीलेश लंके (आमदार, पारनेर)