वर्षभर कोविड विरोधात लढणारा योद्धाच ‘धारातीर्थी’ पडला! धांदरफळ आरोग्य उपकेंद्राचे समुदाय अधिकारी डॉ.अमोल जंगम यांचे कोविडने निधन..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेत मृत्यूदरातही मोठी वाढ झाल्याचे समोर आले असून आत्तापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. देशभरात दररोज सरासरी तीन हजारांहून अधिक जणांचे बळी जात असून त्यात सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे कोविडचे दुसरे संक्रमण अतिशय घातक ठरले ठरले असून आज या संक्रमणाने कोविड रुग्णांची समर्पित भावनेने सेवा करणार्या योद्ध्यालाच धारातीर्थी पाडले आहे. तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच डॉ.अमोल जंगम (वय 38) हा तरुण डॉक्टर त्या विरोधात झुंजत होता आणि माणसं वाचवित होता, आज मात्र कोविडने त्यांचाच बळी घेवून संगमनेरच्या कोविड विरोधातील लढाईलाच मोठा धक्का दिला आहे. या वृत्ताने संगमनेरकरांना मोठा धक्का बसला असून एका निष्णात लढवय्याच्या अशा अकस्मात मृत्यूने संगमनेरातून हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाचा चंचू प्रवेश झाला. त्यानंतरच्या दोन महिन्यात शहर आणि ग्रामीणभागात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने व त्यातच त्यावेळी या महामारीबाबत फारशी माहिती उपलब्ध नसल्याने भितीपोटी अनेक खासगी डॉक्टर्स ‘स्वीचऑफ’ होवून भूमीगत झाले. त्यामुळेे सामान्य नागरिकांना सरकारी आरोग्य व्यवस्था हा एकमेव पर्याय शिल्लक होता. अशा काळात घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयावर ताण वाढल्याने संगमनेर नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनाने पालिकेच्या जून्या कॉटेज रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरु करुन तेथील केनडी हॉलमध्ये (तत्कालीन जनरल वॉर्ड) शहरी रुग्णांसाठी चाळीस खाटांचा विलगीकरण कक्षही सुरु केला.
येथील रुग्णालयाची जबाबदारी निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर पोखरकर यांच्यावर सोपविण्यात आली. मात्र कॉटेजमध्ये कोविडच्या बाह्यरुग्ण विभागासह विलगीकरण कक्षही सुरु झाल्याने त्यांना साहाय्यक म्हणून समर्पित वृत्तीच्या सहकार्याची गरज होती. अशावेळी जवळ कडलग आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या धांदरफळ बु. उपआरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी (सी.एच.ओ) डॉ.अमोल जंगम यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी विनाविलंब त्याला होकार देत केनडी हॉलमधील कोविड बाधितांची जबाबदारी स्विकारली, तेव्हापासून ते गेल्या महिन्यापर्यंत ते येथेच कार्यरत होते. मात्र कोविडच्या दुसर्या लाटेने संपूर्ण तालुक्याची अवस्थाच बिकट झाल्याने त्यांना त्यांच्या मूळ नियुक्तिच्या ठिकाणी धांदरफळ बु. येथील केंद्रावर माघारी पाठविण्यात आले.
धांदरफळ येथील उपकेंद्रात दाखल झाल्यानंतर त्यांनी केवळ दिलेली जबाबदारीच न सांभाळता त्याही पुढे जावून माणसांसाठी, त्यांना जगवण्यासाठी जे करणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत परिसरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, संक्रमणाचा वेग नियंत्रणात आणता यावा यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमातही त्यांचा सिंव्हाचा वाटा होता. संक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे व काय करु नये यासाठी त्यांनी जनजागृती अभियानातही सहभाग घेवून लोकांमध्ये जागृतीचा कार्यक्रम राबविला. त्याचाच परिणाम अगदी संक्रमणाच्या सुरुवातीला त्यांच्या आरोग्य उपकेंद्राच्या अंतर्गत असलेल्या धांदरफळमध्ये कोविडचा उद्रेक होवून तालुक्यातील पहिला कोविड बळी जावूनही नंतरच्या कालावधीत हा संपूर्ण परिसर कोविड प्रादुर्भावाच्या बाबतीत नियंत्रणात आला.
दहा दिवसांपूर्वी डॉ.जंगम यांना कोविडची लागण झाली, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतःला पालिकेच्या केनडी हॉलमध्येच संस्थात्मक विलगीकरण केले. या अल्प कालावधीतही स्वतः रुग्ण असतांनाही ते इतर रुग्णांना धीर देत, त्यांच्यात कोविड विरोधातील लढाई जिंकण्याची ऊर्जा भरण्याचे काम केले. मात्र या दरम्यान त्यांना झालेला संसर्ग अधिक पसरल्याने सुरुवातीला त्यांना डॉ.सुभाष मंडलिक यांच्या मंदना रुग्णालयात, नंतर डॉ.अतुल आरोटे यांच्या रुग्णालयात व शेवटी पुण्यातील नोव्हेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून ते कृत्रिम श्वसनयंत्रावर होते, मात्र गेल्या दहा दिवसांपासून कोविडच्या अदृष्य विषाणूंशी लढतालढता त्यांची शक्ति क्षीण झाली आणि अखेर गेल्या बारा महिन्यांपासून कोविडशी झुंज देत शेकडों नागरिकांना उपचार देवून ठिकठाक करणारा, जिंकण्याची उर्मी भरणारा, जागृती करणारा योद्धा धारातीर्थी पडला.
आज सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त संगमनेरात धडकताच यंत्रणेतील घटकांसह पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये आणि धांदरफळच्या आरोग्य उपकेंद्रात त्यांच्याकडून उपचार घेणार्यांचे डोळे पाणावले. अवघ्या 38 वर्षांच्या धन्वंतरीच्या या पूजकाने गेल्या वर्षभर नागरिकांची अविरत सेवा केली, अनेकांना मृत्यूच्या दारातून परत आणले. मात्र स्वतःच्या जगण्याच्या लढाईत ते अपयशी ठरले आणि आज सकाळी पुण्यातच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, लहान भाऊ, पत्नी व सात वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने आम्ही सून्न झालो असल्याची भावनिक प्रतिक्रीया यावेळी प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड, डॉ.भास्कर भंवर, इंन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया आदींनी दिली आहे.
संगमनेर नगर पालिकेच्या कॉटेज रुग्णालयात कोविड रुग्णालय व विलगीकरण कक्ष सुरु झाल्यापासूनच डॉ.अमोल जंगम माझ्यासोबत कार्यरत होते. कोणत्याही कामाचा स्विकार करण्याची त्यांची वृत्ती आणि झोकून देवून काम करण्याची त्यांची पद्धत यामुळे केवळ वैद्यकीय कर्मचारीच नव्हेतर रुग्णांनाही त्यांच्याविषयी प्रेम निर्माण होईल असा त्यांचा स्वभाव होता. गेल्या दहा दिवसांपासून कोविडशी सुरु असलेली त्यांची झुंज ते जिंकतील असा मला विश्वास होता, मात्र नियतीने तो फोल ठरवला. एका निस्पृह वैद्यकीय सेवकाचा अशा पद्धतीने महामारीत झालेला मृत्यू मनाला खोलवर वेदना देणारा आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करोत अशी प्रार्थना.
डॉ.किशोर पोखरकर
निवृत्त वैद्यकीय अधिकारी