सत्यजीत तांबें भोवती फिरतंय संगमनेरचं राजकारण! विरोधक ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत; समर्थकांना मात्र पक्षांतराची घाई..


श्याम तिवारी, संगमनेर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अवघ्या काही महिन्यांतच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु होणार आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक बहुमत मिळाल्याने उत्साहात असलेल्या महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनही मोठी अपेक्षा आहे. संगमनेरातही यंदा चार दशकानंतर मिळालेल्या यशाने विरोधकांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून पालिकेवरही ‘थोरात-तांबे’ यांचीच सत्ता आहे. मात्र यावेळी संगमनेरकरांनी परिवर्तनाची कास धरल्याचा अनुमान लावून उत्साहात असलेल्या विरोधकांना ‘अपक्ष’ आमदार सत्यजीत तांबे यांच्या भूमिकेने चाप लागला आहे. महिन्याभरातील त्यांच्या काही वक्तव्यांतून त्यांचा कल स्पष्ट होत असतांनाच त्यांनी थेट राहुल गांधींवरच निशाणा साधून एकप्रकारे आपण काँग्रेसच्या विचारांना कायमस्वरुपी सोडचिठ्ठी दिल्याचा संदेश दिल्याने त्याचा संगमनेरच्या राजकारणावर परिणाम झाला आहे. त्यातून त्यांच्या समर्थकांनी भाजप प्रवेशाच्या वावड्याही उठवल्या, मात्र निष्कर्षाशिवाय त्याही बसल्या. काही समर्थकांनी राज्य सरकारच्या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिका सोशल माध्यमातून इकडे-तिकडे फिरवून पुन्हा जमिनीवर फूंकर मारली. तरीही काहीच घडले नाही. मात्र यासर्व घडामोडींमधून आमदार तांबे यांनी संगमनेरचे राजकारण आपल्याभोवती केंद्रीत केल्याने निवडणुकांचा माहौल असूनही संगमनेरच्या विरोधकांना मात्र ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका स्वीकारावी लागली आहे.


तब्बल 25 वर्ष काँग्रेसच्या विचारांशी निष्ठा राखून सामान्य कार्यकर्ता ते युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत संघटनात्मक योगदान देणार्‍या सत्यजीत तांबे यांनी 2023 मध्ये झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत वडिलांऐवजी आपल्यासाठी उमेदवारीची मागणी केली. मात्र पक्षाने त्यांची मागणी फेटाळून डॉ.सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फॉर्म पाठवल्याने नाईलाजास्तव ऐनवेळी त्यांचा अर्ज मागे ठेवून त्यांनी आपला अर्ज दाखल केला. शिस्तभंग म्हणून दोघांनाही पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. निवडणुकीच्या निकालानंतर चारवेळा आमदार तांबे यांनी पक्षाला विनंतीपत्र पाठवून निलंबन मागे घेण्याची विनंती केली. मात्र पक्षाने आजवर त्याला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचा दावा त्यांनी अनेकदा केला आहे. संघटनेला 25 वर्ष दिल्यानंतर कर्तृत्व असूनही जर तुम्हाला डावलले जात असेल तर काय केले पाहिजे? असा सवाल उपस्थित करताना मनातली सलही त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यातूनच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधून सुरुवातीपासूनच आपल्या राजकारणाची दिशा निश्‍चित केल्याचे दिसत असतानाच अलिकडच्या काळात त्यांनी केलेली काही वक्तव्य चांगलीच चर्चेत आली आहेत.


मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांचा ‘स्नेह’ सर्वश्रूत आहे. मध्यंतरी त्यांच्या काही वक्तव्यांनी राजकीय संशयही निर्माण झाला होता. गेल्या आठवड्यात एका माध्यम प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी थेट राहुल गांधींवरच निशाणा साधल्याने एकप्रकारे त्यांनी काँग्रेस विचारांपासून अथवा नेतृत्वापासून फारकत घेतल्याचेही दिसून आले. विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेर मतदारसंघात वाढलेला त्यांचा राबता, विकासकामांवरुन सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न यातून त्यांनी संगमनेरचे राजकारण स्वतःभोवती केंद्रीत केले आहे. पदवीधरच्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी फडणवीसांशी जवळीक साधल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा तेव्हापासूनच सुरु आहेत. त्यात अलिकडील काळात त्यांनी एकामागून एक केलेली विधानं आणि थेट गांधींवरच निशाणा यातून नेमका संदेश देण्याचाही प्रयत्न केल्यानेे संगमनेरच्या स्थानिक राजकारणात ‘गोंधळ’ निर्माण झाला आहे.


संगमनेर नगरपालिकेवर गेल्या साडेतीन दशकांपासून ‘थोरात-तांबे’ यांचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत तर, विरोधकांना आपल्या अस्तित्वासाठीच झगडावे लागले होते. मात्र यावेळी तब्बल चार दशकानंतर संगमनेर विधानसभेत परिवर्तन झाले आहे. त्यामुळे विराधी महायुतीचे मनसुबे आकाशी भिडलेले आहेत. बदलत्या राजकीय वातावरणाचा फायदा पालिकेच्या निवडणुकांमध्ये होईल अशी विरोधकांना आशा आहे. मात्र त्याचवेळी ज्यांच्याशी मुकाबला आहे, त्यांच्याच पक्षप्रवेशाच्या चर्चांनी नवा राजकीय ‘गोंधळ’ घातल्याने विरोधकांच्या हालचाली सोशल माध्यमातील क्रिया-प्रतिक्रियांपर्यंतच मर्यादीत आहेत.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा चार दशकांचा अभेद्य बुरुज भेदून अमोल खताळ यांनी संगमनेर मतदार संघावर भगवा फडकावल्यानंतर मनोधैर्य उंचावलेल्या महायुतीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मोठे यश मिळण्याची आशा आहे. त्या अनुषंगाने संगमनेरच्या विरोधकांनी राजकीय आखाडे बांधण्यास सुरुवात करणं अपेक्षित असताना आमदार सत्यजीत तांबे यांनी मात्र सर्वांच्या नजरा आपल्याकडे खिळवण्यात यश मिळवले आहे. सध्या उठत असलेल्या राजकीय वावड्यांनुसार घडल्यास पालिकेची निवडणूक कोणाविरोधात लढवणार? असा प्रश्‍न महायुतीच्या इच्छुकांसमोर उभा राहु शकतो. त्यामुळे पालिकेच्या निवडणुका दृष्टीपथात असतानाही संगमनेरातील राजकीय वातावरण अद्यापही ‘थंड’च असून आमदार सत्यजीत तांबे यांनी निर्माण केलेला राजकीय ‘गोंधळ’ आटोपल्यानंतरच ते तापण्याची शक्यता आहे.

Visits: 475 Today: 2 Total: 1416711

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *