‘अगस्ति’चे ऊसतोड मजूर यशस्वी हंगामानंतर परतले मायभूमी! कोरोनाला साधे जवळ फिरकूही न देता घालून दिला आदर्श वस्तुपाठ

नायक वृत्तसेवा, अकोले
सध्या देशभर कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रोज बाधितांच्या विक्रमी रुग्णसंख्येसह बळींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यातच दिलासादायक वृत्त पुढे आले असून, साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करुन ऊसतोड मजूर कोरोनाला साधे जवळ फिरकूही न देता मायभूमी परतले आहे. ही किमया अकोलेतील अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या सूक्ष्म नियोजनाने साधली आहे.
![]()
अगस्ति सहकारी साखर कारखान्यांतर्गत ऊसतोड करण्यासाठी विविध जिल्ह्यांतून सुमारे 8 हजार मजूर अकोले तालुक्यात आले होते. सुगाव, कोतूळ, बोरी, उंचखडक, देवठाण, इंदोरी आदी गावांत त्यांनी राहुट्या थाटल्या होत्या. कारखाना कार्यक्षेत्रातील विविध गावांत त्यांनी ऊसतोडीचे काम केले. सध्या हे कामगार परतीच्या प्रवासाला निघाले असून, नुकताच त्यांनी बैलांचा पोळाही साजरा केला. मात्र कोरोनाच्या भयावह संकटातही पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुरांनी दिलासादायक बातमी दिली आहे. गेल्या सहा महिन्यात एकही कामगार अथवा मुलाबाळांना कोरोनाची लागण झाली नाही.

अगस्ति कारखान्याने आमची काळजी घेत मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या झोपड्यांमध्ये थेट किराणा व भाजीपाला पाठविला असल्याची प्रतिक्रिया ऊसतोड मजूर पवार यांनी दिली. यासाठी कुठेही बाजारात जाण्याची गरज पडली नसल्याचे मीराताई यांनी सांगितले. याकामी कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी लक्ष घातले होते. स्वतः ऊसतोडीचे चटके घेतलेले असल्याने त्यांनी कुटुंबियांप्रमोण मजुरांची व्यवस्था केली. रोज सकाळी मजुरांसह कुटुंबियांची तपासणी, प्राणवायू पातळी तपासणी करण्याबरोबर औषधे, शुद्ध पिण्याचे पाणी, किराणा, भाजीपाला व दूध पाठवत असत. हे सर्व सूक्षम नियोजन कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावर कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकर पिचड बारकाईने लक्ष ठेवून होते. प्रसंगी सूचनाही देत होते. कारखान्याचे संचालक प्रकाश मालुंजकर, महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ, गुलाब शेवाळे, बाळासाहेब ताजणे, रामनाथ वाकचौरे आदी संचालकही आपापल्या गावांमध्ये ऊसतोड कामगारांची काळजी घेत होते.

विनाकारण न फिरता आणि रोजचा कामधंदा चालू ठेवूनही कोरोनाला जवळ फिरकू न दिल्याचा वस्तुपाठ अगस्ति कारखान्याच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांनी घालून दिला आहे. हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करुन मजूर आपल्या मायदेशी परतले आहे. यातून इतर नागरिकांनी धडा घ्यावा आणि कोरोनाचे समूळ उच्चाटन करावे हीच अपेक्षा.
