संगमनेर बसस्थानकातून एकोणावीस वर्षीय तरुणाचे अपहरण? मीरा-भाईंदरमध्ये केली स्वतःची सुटका; अपहरणाचा बनाव केल्याचीही शक्यता..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातून दररोज कोपरगावमधील महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणारा एकोणावीस वर्षांचा एक विद्यार्थी सोमवारी अचानक गायब झाला. त्याच्या परतण्याच्या वेळेत तो घरी न आल्याने त्याच्या आईने त्याच्या मोबाईलवर वारंवार फोनही केले, नातेवाईक व मित्रमंडळींकडे चौकशीही केली. मात्र त्याचा कोणताच थांगपत्ता न लागल्याने अखेर मध्यरात्र उलटल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या आईने शहर पोलीस ठाण्यास हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना हे प्रकरण पूर्ण समजण्यापूर्वीच ‘त्या’ विद्यार्थ्याने आज पहाटे आपल्या आईला फोन करीत संगमनेर बसस्थानकातून आपले अपहरण झाले होते, मात्र आपण कशीबशी आपली सुटका करुन घेतली असून मुंबईत आपल्या काकांकडे असल्याची माहिती दिली. या प्रकरणात पोलिसांचेही सहकार्य मिळाल्याची माहिती त्याने दिली, मात्र असे असताना त्याची सुटका करणार्‍या पोलिसांनी या घटनेला बारा तासांचा कालावधी उलटूनही संगमनेर पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार बनावट असल्याचा संशय निर्माण झाला असून कथित अपहरण झालेला तरुण संगमनेरात परतल्यानंतरच यामागील गुढ समोर येणार आहे.

याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरानजीकच्या घुलेवाडीत राहणारा योगेश चंद्रकांत लांडे (वय 18 वर्ष 9 महिने) हा कोपरगाव येथील संजीवनी महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो दररोज आपल्या दुचाकीवरुन घुलेवाडीतून संगमनेरात येवून शासकीय विश्रामगृहात आपली दुचाकी उभी करतो व त्यानंतर बसने कोपरगावला जात असतो. त्याप्रमाणे सोमवारीही (ता.31) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला व नेहमीप्रमाणे आपली दुचाकी लावून तो कोपरगावच्या दिशेने गेला. त्यानंतर काही वेळाने त्याच्या मोबाईलवरुन एकाने त्याच्याच आईशी संपर्क साधून आज बसला गर्दी असल्याने आम्ही दोघे एकाच दुचाकीवरुन कॉलेजला जात असल्याचे त्याने सांगितले.

रात्री आठ वाजून गेले तरीही आपला मुलगा घरी आला नसल्याने काळजीत पडलेल्या त्याच्या आईने त्याला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या चिंताही वाढल्या. त्यानंतर त्याच्या आईने त्याचे सर्व मित्र, नातेवाईक यांच्याकडेही चौकशी केली, मात्र हाती काहीच लागले नाही. सर्वत्र शोधाशोध करुनही आपल्या मुलाचा पत्ता लागत नसल्याने अखेर त्याच्या आईने मध्यरात्र उलटून गेल्यानंतर शहर पोलिसांकडे जावून आपला मुलगा हरविल्याची तक्रार दाखल केली व नेहमीच्या प्रघातानुसार बिनतारी यंत्रणेद्वारा आसपासच्या पोलीस ठाण्यांना त्याची माहितीही दिली.

हा सगळा प्रकार झाल्यानंतर आज (ता.01) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक त्या विद्यार्थ्याने आपल्या मोबाईलवरुन आईला फोन करीत आपले अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती दिली. विश्रामगृहात दुचाकी उभी करुन आपण बसस्थानकात आलो, यावेळी लघुशंकेसाठी प्रसाधनगृहात गेलो असता तेथे असलेल्या दोघांनी आपल्या नाकाला रुमाल लावला. त्यानंतरचे आपल्याला काहीच आठवत नाही, मात्र आत्ता आपणास शुद्ध आली तेव्हा आपण एक चारचाकी वाहनात असून अन्य दोघे-तिघेही वाहनात झोपलेल्या अवस्थेत दिसले. तसेच वाहनातील अन्य माणसं एका ढाब्यावर थांबून जेवण करीत असल्याचे पाहून आपण गुपचूप वाहनातून महामार्गावर पळत पळत एका पेट्रोल पंपावर थांबल्याची माहिती त्याने दिली.

येथून आपण पंपावरील कर्मचार्‍यांच्या मदतीने पोलिसांनाही फोन केला असून टिटवाळ्यात राहणार्‍या काकांनाही कळविल्याची माहिती त्याने दिली. आपण आत्ता नेमके कोठे आहोत याची कोणतीही कल्पना आपणास नसल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे त्याची आई प्रचंड घाबरली, मात्र इतका सगळा प्रकार घडूनही त्यांनी स्थानिक पोलिसांना मात्र याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. आज सकाळी प्रस्तृत प्रतिनिधीला याबाबत सूत्रांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर तपासी अंमलदारांपासून पोलीस उपअधीक्षकांपर्यंतच्या वरीष्ठ अधिकार्‍यांकडे विचारणा करुनही असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे उत्तर त्यांच्याकडून मिळाले.

अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी कोठेही कारवाई केली असेल व त्यात अपहरण अथवा बेपत्ता व्यक्तिचा शोध लागला असेल तर तेथील पोलीस तत्काळ संबंधिताच्या मूळगावी असलेल्या पोलिसांना त्याची माहिती देतात. या प्रकरणात आपले अपहरण झाल्याचे सांगणार्‍या विद्यार्थ्याने आपण पोलिसांनाही कळविल्याचे सांगितले होते, त्यामुळे जर या प्रकरणात पोलिसांची एंट्री झाली होती तर मग संगमनेर पोलिसांना असा काही प्रकार घडल्याचे का समजले नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर विद्यार्थ्याचे खरोखरच अपहरण झाले होते की त्याने कोणत्या तरी अन्य कारणाने अपहरणाचा बनाव निर्माण केला होता यामागील सत्य समोर येण्याची गरज आहे. संगमनेर पोलिसही त्याच दृष्टीने तपास करीत आहेत.

कथित अपहरण झालेला विद्यार्थी सध्या टिटवाळ्यात त्याच्या काकांकडे सुरक्षित असून वाहनचालक असलेले त्याचे वडील धुळ्याहून माघारी येवून टिटवाळ्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्याला घेवून ते परतल्यानंतर पोलीस चौकशीत या संपूर्ण प्रकरणामागील सत्य समोर येण्याची दाट शक्यता आहे. या वृत्ताने मात्र संगमनेरात खळबळ उडाली असून संगमनेरसारख्या सुसंस्कृत शहरात जर अशाप्रकारे एकोणावीस वर्षांच्या मुलाचे चक्क गजबजलेल्या बसस्थानकासारख्या ठिकाणाहून अपहरण झाले असले तर ते अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणातील वास्तव समोर येण्याची गरजही यानिमित्ताने समोर आली आहे.

Visits: 138 Today: 3 Total: 1112406

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *