विवाहेच्छुक युवकाला फसविणार्‍या टोळीचा पर्दाफाश पाच जणांना ठोकल्या बेड्या; कट रचून फसवणूक केल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, नेवासा
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लूटमार करण्यार्‍या टोळ्यांचा अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सुळसुळाट झाला आहे. त्यानंतर आता लग्नाच्या आमिषाने मुलगी दाखवण्याचा बनाव करून फसवणूक करण्याचे प्रकार नेवासा तालुक्यात वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर नाशिक आणि मराठवाड्यातही नेवाशातील या टोळ्यांचा उपद्रव सुरू आहे. जालना जिल्ह्यातील एका विवाहासाठी इच्छुक असणार्‍या युवकाच्या वेळीच लक्षात आल्याने अशीच एक टोळी पकडली गेली. पोलिसांनी टोळीतील पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या ते पोलीस कोठडीची हवा खात आहेत.
विवाह रखडलेल्या युवकांना मध्यस्थांमार्फत शोधून लग्न जुळवून देतो असं सांगून पैसे उकळणार्‍या या टोळ्या कार्यरत आहेत. मुलगी दाखवण्याचा बनाव करायचा, पैसे घेऊन नंतर पळून जायचे. तर कधी लग्नही लावून द्यायचे मात्र, लग्नानंतर मुलीने लगेच पळून यायचे, अशा पद्धतीने गुन्हे या टोळ्या करत आहेत. यातून विवाहेच्छुक युवकांकडून लाखो रुपये उकळले जात आहे. बदमानीच्या भीतीने कोणी तक्रार करण्यास धजावत नसल्याने या टोळ्यांचे फावते. जालना जिल्ह्यातील एका युवकाच्या बाबतीतही असाच प्रकार घडत होता. मात्र, वेळीच लक्षात आल्याने पैसे देण्यापूर्वीच त्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस आले आणि टोळी पकडली गेली.

दरम्यान, हा युवक मोलमजुरीने काम करतो. त्याचे लग्न करायचे असल्याने त्याची बहीण त्याच्यासाठी मुलगी शोधत होती. तिच्या गावातील परिचित ओमकार भानुदास कासार याला तिने मुलगी पाहण्यास सांगितले होते. कासार याने नेवासा येथील एक स्थळ आणले. त्यासाठी नेवासा येथे जावे लागेल आणि मुलीच्या नातेवाईकांना 1 लाख 20 हजार रुपये द्यावे लागतील, असं सांगितलं. त्यानुसार पवार नातेवाईकांसह आणि ओमकार भानुदास कासार व त्याचा मित्र रावसाहेब नारायण वानखेडे यांच्यासह नेवाशात आले. तेथे गेल्यावर बसस्थानकासमोर गाडी थांबवून कासार पैशाची मागणी करून लागला. आधी पैसे द्या, मग मुलगी दाखवू असं सांगितलं. त्यावर पवार याने एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे मिळाले नाहीत.

गावी परत गेल्यावर पैसे देतो असे त्याने सांगितले. त्यानंतर कासार याने कोणाला तरी फोन केला. थोड्या वेळात तेथे दोन महिला व एक मुलगी आली. त्यांनी प्रथम मुलीचे नाव कोमल राजू साठे, तिची मावशी संगीता वसंत जाधव (रा. पैठण, जि. औरंगाबाद) व दुसरी महिला सुमन रमेश वाघमारे (रा. हडपसर, पुणे) अशी ओळख करून दिली. त्यानंतर लगेच पैसे द्या, अशी मागणी करू लागले. मुलीला आई-वडील नाहीत. तिची मावशी लग्न करून देणार आहे, त्यासाठी पैसे हवेत, असे ते सांगत होते. मात्र, त्यांच्या बोलण्यावरून पवार यांना संशय आला. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी महिलांनी अचानक भूमिका बदलली. पैसे दिले नाही तर आमच्यासोबत आणखी मुली आणल्या आहेत. त्या तुमच्याविरूद्ध अत्याचाराची फिर्याद देतील, अशी धमकी दिली. त्यामुळे पवार यांनी बाजूला जाऊन पोलिसांना फोन केला. पोलिसही तातडीने तेथे आले आणि सर्वांनाच पोलीस ठाण्यात नेले. तेथे विजय देविदास पवार यांच्या फिर्यादीवरून ओमकार भानुदास कासार, रावसाहेब नारायण वानखडे (दोघे रा. तीर्थपुरी, ता. घनसांगवी, जि. जालना), कोमल राजू साठे, संगीता वसंत जाधव (रा. पैठण, जि. औरंगाबाद) व सुमन रमेश वाघमारे (रा. हडपसर, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कट रचून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.

Visits: 111 Today: 1 Total: 1115030

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *