वादळाने उडवली दैना; वखार महामंडळाचे गोदाम पुन्हा पेटले..! दुपारनंतर माघारी परतलेल्या अग्निशमन बंबांना पुन्हा बोलावण्याची पाळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मंगळवारी रात्री आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीतील वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेली आग 26 तासानंतरही धुमसत आहे. आज सायंकाळच्या सुमारास सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने दुपारी नियंत्रणात आलेली ही आग पुन्हा एकदा भडकली आहे. त्यामुळे वादळाने उडविली दैना असे म्हणत प्रशासनाने दुपारनंतर माघारी पाठवलेले जिल्ह्यातील विविध ठिकाणचे अग्निशमन बंब पुन्हा माघारी बोलावले आहेत. त्यातील प्रवरा सहकारी साखर कारखाना आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे बंब दाखल झाली असून सिन्नर, शिर्डी, राहाता, राहुरी व श्रीरामपूर येथील बंब काही वेळातच संगमनेरात पोहोचण्याची शक्यता आहे.

काल मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील वखार महामंडळाच्या गोदामाला भिषण आग लागली होती. या गोदामामध्ये प्रत्येकी 170 किलो वजनाच्या कापसाच्या 13 हजार 165 गाड्या (मूल्य 17 कोटी 37 लाख), नाफेडने हमीभावानुसार खरेदी केलेला 2 कोटी 13 लाख रुपये मूल्याचा 4 लाख 41 हजार 150 किलो चना, पाच लाख रुपये मूल्याची 12 हजार 500 किलो मिरी, दोन लाख रुपये मूल्याचे 12 हजार 10 किलो सोयाबिन, सात लाख रुपये मूल्याची 70 हजार किलो बाजरी आणि 10 हजार 500 किलो गहू असा एकूण 19 कोटी 96 लाख रुपयांचा अन्नधान्य व कापसाचा साठा आणि 2 कोटी रुपयांचे गोदाम असा एकूण 21 कोटी 96 लाख रुपयांचा मुद्देमाल या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

याबाबतची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिका व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या प्रत्येकी दोन बंबांनी बाजार समितीकडे धाव घेतली. मात्र गोदामात मोठ्या प्रमाणात कापसाच्या गंजी असल्याने काही वेळातच संपूर्ण गोदाम आगीच्या प्रचंड ज्वाळांनी वेढले गेले. त्यामुळे या चार बंबांनी त्यावर नियंत्रण मिळवणे अशक्यप्राय वाटत असतानाच मालपाणी उद्योग समूहाच्या टँकरद्वारे एका बंबाला पाणीपुरवठा करून एक बंंब जागेवरच ठेवण्यास सुरुवात झाली.

त्याच दरम्यान अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना, प्रवरा नगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना यासह कोपरगाव, शिर्डी, राहाता व श्रीरामपूर येथील नगर परिषदांचे अग्निशामक बंबही संगमनेरात दाखल झाले होते. एकूण अकरा बंबांंद्वारा रात्री दहा वाजेपासून ते आज दुपारी तीन वाजेपर्यंत एक सारखा पाण्याचा मारा करण्यात आला. त्यानंतर सदरची आग नियंत्रणात आली असे दिसू लागल्याने प्रशासनाने बाहेरगावाहून बोलाविले अग्निशमन बंब माघारी पाठवण्याचा निर्णय घेतला.

अन्य ठिकाणाहून आलेले बंब माघारी गेले असले तरीही पालिका आणि थोरात कारखान्याच्या बंबांद्वारा सदरच्या आगीवर पाण्याचा मारा सुरूच होता. मात्र आग पूर्णत: नियंत्रणात आलेली नव्हती. त्याच दरम्यान सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाचीही भर पडल्याने जिल्ह्यातील बंबांंनी अहोरात्र परिश्रम घेत नियंत्रणात आणलेली आग पुन्हा अनियंत्रित झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने माघारी पाठविले सर्व अग्निशमन बंब पुन्हा तातडीने माघारी बोलाविले आहेत. त्यातील अकोल्याच्या अगस्ती सहकारी साखर कारखाना व प्रवरानगर पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचा बंब संगमनेरात पोहोचला असून उर्वरित बंब काही वेळातच संगमनेरात पोहोचण्याची शक्यता आहे.

Visits: 151 Today: 3 Total: 1115046
