भेंडा येथील कोविड सेंटरमध्ये खेळासह प्राणायामाचे धडे मनातील दडपण दूर होऊन रुग्ण होताहेत ठणठणीत बरे
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील भेंडा येथे शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचे मानसिक धैर्य व शारीरिक शक्ती वाढविण्यासाठी खेळासह प्राणायामाचे धडे देण्यात येत आहेत. याद्वारे त्यांच्या मनातील दडपण दूर करण्याचा प्रयत्न होत असून, रुग्णही ठणठणीत बरे होत असल्याचा प्रत्यय येत आहे. या अनोख्या उपक्रमाबद्दल तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाला नागरिक धन्यवाद देत आहे.
सद्यस्थितीत य कोविड केअर सेंटरमध्ये तीनशे खाटांची व्यवस्था करण्यात आली असून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केलेल्या आवाहनानुसार अनेक दात्यांनी मदतीचा हात दिला आहे. तर अजूनही मदत होत आहे. नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक कडूभाऊ काळे हे देखील याबाबत पुढाकार घेताना दिसत आहे. दोन आठवड्यापूर्वी याच कोविड सेंटरला पंचगंगा उद्योग समूहाच्यावतीने 100 खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काशिनाथ नवले यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा तीस खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच ज्ञानमाऊली चर्चचे फादर प्रकाश राऊत यांनी देखील कोविड रुग्णांसाठी उपयुक्त असणार्या फॅबी फ्ल्यूची सुमारे पन्नास हजार रुपयांची औषधे देऊन मोठा हातभार लावला आहे.
कोविड रुग्णांची मनातील असलेली भीती दूर व्हावी आणि आत्मिक बळ मिळण्यासाठी त्यांच्याकडून प्राणायाम करून घेतले जात आहे. याचा सकारात्मक परिणाम होत असून, रुग्णांच्या मनातील धडकी दूर झालेली दिसत आहे. याचबरोबर कोविड सेंटरच्या प्रांगणात रुग्णांना खेळण्यासाठी देण्यात आलेल्या क्रीडा साहित्यामुळे पुरुष रुग्ण मनसोक्त क्रिकेट खेळत आनंद लुटताना दिसत आहे. महिलाही पारंपरिक खेळ खेळून वेगळा आनंद लुटत आहे. या सर्व राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा रुग्णांच्या प्रकृतीवर चांगलाच परिणाम झालेला दिसत असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांतून जोरदार स्वागत होत आहे.