भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सव 15 मेपासून होणार सुरू! कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव विभागाच्यावतीने पर्यटकांना विविध सूचना..

नायक वृत्तसेवा, भंडारदरा
अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सवाला बळकटी यावी हा उद्देश समोर ठेऊन शेंडी (भंडारदरा) येथील वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात अभयारण्यात क्षेत्रातील वन समिती सदस्य व सरपंच यांच्यासमवेत वन्यजीव विभागाची बैठक नुकतीच संपन्न झाली. काजव्यांच्या कालचक्राला कोणतीही बाधा येऊ नये म्हणून वेगवेगळ्या सूचना अंमलात आणण्याचे संकेत कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

भंडारदरा धरण परिसरात व रिंगरोडवरील काजवा महोत्सव जगविख्यात आहे. या काजवा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले मे महिन्याच्या अखेरीस आपोआपच भंडारदर्‍याच्या दिशेने वळू लागतात. गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे भंडारदर्‍याचा काजवा महोत्सवही थांबला गेला होता. पंरतु आता कोरोना सदृष्यस्थिती मावळल्यामुळे भंडारदर्‍याच्या वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रात 15 मे ते 15 जून या कालावधीत काजवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. काजव्यांचे दिवसेंदिवस प्रमाण घटत चालल्याचे दिसून येत असून काजव्यांच्या कालचक्रात कोणतीही बाधा येऊ नये म्हणून वन विभागाकडून काही ठोस पावले उचलली गेली आहेत. त्यासाठी काजवा महोत्सवात भंडारदरा परिसरात येणार्‍या पर्यटकांना एका विशिष्ट ठिकाणी आपली वाहने उभी करुन त्यानंतरच काजव्यांचा आनंद घेता येणार आहे.

मद्य, साऊंड सिस्टीम व प्लास्टिक पर्यटकांना अभयारण्यात घेऊन जाता येणार नाही. अभयारण्यात वरीलपैकी कोणतीही वस्तू आढळून आल्यास किमान 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कोणतेही वाहन रस्त्यात उभे करता येणार नाही. रस्त्यात वाहन उभे केलेले आढळून आल्यास 1 हजार रुपये दंड वन्यजीव विभागाकडून आकारण्यात येईल. तसेच काजवा महोत्सवात वन विभागाच्या अभयारण्यात रात्री साडेनऊ नंतर पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही. अभयारण्यातून रात्री साडेदहापर्यंत बाहेर पडणे बंधनकारक असेल. अभयारण्यात डीजे अथवा इतर वाद्य वाजविताना आढळून आल्यास वन विभाग व पोलीस कारवाई करतील अशी माहीती वन्यजीव विभागाचे प्रमुख सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांनी दिली.

काजवा महोत्सवाच्या कालावधीत काजव्यांच्या लीलयेचा आनंद घेताना आदिवासी लोकसंस्कृतीच्या लोककलेचा आनंद घेता यावा यासाठी लव्हाळवाडी येथे लोककलेचे प्रत्येक शनिवारी व रविवारी आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आहे. या बैठकीसाठी वन्यजीव विभागाच्या हद्दीतील समावेश असलेल्या गावांचे सरपंच, वन समिती सदस्य, नाशिक वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे, राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, दत्ता पडवळे हे उपस्थित होते.

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील काजवा महोत्सवात पर्यटकांनी काजव्यांचा निखळ आनंद घ्यावा. काजवा महोत्सवास गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. काजवा महोत्सवात मद्यपान करुन धांगडधिंगा करणार्‍या पर्यटकांना कारवाईस सामोरे जावे लागेल.

– नरेंद्र साबळे (सहाय्यक पोलीस निरीक्षक-राजूर)


भंडारदरा काजवा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येणारा पर्यटक हा दूरवरुन येणारा आहे. कुटुंबासह काही पर्यटकांना उशीर झाल्यास त्यांच्या आनंदात विरंजन पडू नये यासाठी अभयारण्यात प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्यास मदत व्हावी.
– दिलीप भांगरे (सरपंच-शेंडी)

Visits: 4 Today: 2 Total: 30611

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *