सायखिंडी येथे धारदार शस्त्राने तरुणाची निर्घृण हत्या.. हत्येचे कारण अस्पष्ट; तालुका पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील सायखिंडी येथील 28 वर्षीय तरुणाची दोघा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.25) सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सचिन अरविंद शिंदे (वय 28, रा.मोठेबाबा मळा, सायखिंडी) असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, सचिन शिंदे यास अज्ञातांनी त्याच्या राहत्या घरून बोलावून घेत दुचाकीवर बसवून सायखिंडी गावच्या शिवारातील सोमनाथ पारधी यांच्या शेतामध्ये नेले. तेथे दोघा अज्ञातांनी सचिन शिंदे याच्या मानेवर व डोक्यावर धारदार शस्त्राने जबर वार करत निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, पोलीस उपाधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आदिंनी घटनास्थळी जाऊन पंचनामा तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला.

याप्रकरणी तरुणाचे वडील अरविंद शिंदे यांनी संगमनेर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात गुरनं.161/2021 भादंवि कलम 302, 364, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संशयित म्हणून पोलिसांनी दोन ते चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी पोलीस करत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.एस.सानप हे करत आहे.

सचिन शिंदे या तरुणाची हत्या एकतर अनैतिक संबंधाच्या कारणावरून किंवा आर्थिक देवाण-घेवाणीतून झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने हत्या प्रकरणी गावातील चार जणांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दैनिक नायकशी बोलताना सांगितले.

Visits: 140 Today: 2 Total: 1100530

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *