आजवरचे सर्व उच्चांक मोडीत तालुक्यात आढळले चारशे रुग्ण! संगमनेर तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येनेही ओलांडला चौदा हजारांचा टप्पा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
रोजच्या मोठ्या प्रमाणातील रुग्णती आणि त्यात मृतांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील कोविड स्थिती भयंकर अवस्थेत पोहोचली आहे. या श्रृंखलेत आजच्या रुग्णसंख्येने तर कोविड संक्रमण सुरु झाल्यापासूनचे संगमनेर तालुक्याचे सर्व उच्चांक मोडीत काढीत आज तब्बल 392 रुग्ण समोर आले आहेत. समाधाकारक बाब म्हणजे वाढत्या संक्रमणातही शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात दिसत असून आज शहरातील पन्नास जणांना सक्रमण झाल्याचे समोर आले आहे. आजच्या उच्चांकी रुग्णवाढीने तालुका आता 14 हजारांचा टप्पा ओलांडून 17 हजार 78 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोविडच्या प्रादुर्भावात मोठी वाढ होवून दररोजच्या जिल्ह्यातील बाधितांच्या आकडड्यांनी तीन हजारांची मर्यादाही मागे टाकल्याचे चित्र होते. आज मात्र त्यातून काहीसा मिळत जिल्ह्यातील रुग्णसंख्येत काहीशी घट झाल्याचे समोर आल्याने वाढत्या संक्रमणातही जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 1 हजार 608, खासगी प्रयोगशाळेचे जिल्ह्यातील 642 आणि रॅपीड अँटीजेनद्वारा 616 अशा जिल्ह्यातील एकूण 2 हजार 866 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या काही दिवसांतील आजची रुग्णसंख्या निचांकी असल्याने त्यातून जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
एकीकडे जिल्ह्यातील रोजच्या संक्रमणात काहीशी घट आणि त्यातून दिलासा मिळाला असतांना दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील संक्रमणाने मात्र आजवरचे सर्व उच्चांकी मागे टाकले आहेत. शासकीय प्रयोगशाळेकडे अडकलेल्या 224, खासगी प्रयोगशाळेच्या 162 आणि रॅपीड अँटीजेनच्या सहा अशा 392 अहवालांमधून संगमनेरच्या बाधित रुग्णसंख्येने आज नवा उच्चांक गाठला असून तालुक्याच्या रुग्णसंख्येला 14 हजारांच्या पार नेले आहे. मात्र त्याचवेळी शहरी रुग्णसंख्येतील रुग्णघट संक्रमणाच्या सावटातही काहीसा दिलासा देणारी ठरली आहे. एकीकडे आज तालुक्यात उच्चांकी रुग्ण समोर आलेले असतांना दुसरीकडे शहरी रुग्णसंख्येत घट होण्याची श्रृंखला कायम असून आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील अवघ्या पन्नास रुग्णांचा समावेश आहे. अकोले तालुक्यातूनही आज तब्बल 277 रुग्ण समोर आले आहेत.
जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून समोर येत असलेल्या रुग्णांची संख्या सरासरी तीन हजारांहून अधिक आहे. आज मात्र त्यात बर्याचअंशी घट झाल्याचे सुखद चित्र दिसले. आजच्या अहवालातून जिल्ह्यातील सर्वाधीक 469 रुग्णवाढ अहमदनगर महापालिका क्षेत्रात झाली. गेल्या काही दिवसांतील या भागातील रुग्णांचे आकडे बघता ही संख्या खुप कमी आहे. त्याखालोखाल आज संगमनेर तालुक्यात सर्वाधीक 392, अकोले 277, शेवगाव 234, कर्जत 183, राहाता 159, नगर ग्रामीण 157, पारनेर व पाथर्डी प्रत्येकी 126, नेवासा 124, राहुरी 120, श्रीगोंदा 115, श्रीरामपूर 101, जामखेड 100, भिंगार लश्करी परिसर व कोपरगाव प्रत्येकी 72, इतर जिल्ह्यातील 26, लष्करी रुग्णालयातील 12 व अन्य जिल्ह्यातील एक अशा एकूण 2 हजार 866 जणांचा त्यात समावेश आहे.