कोरोनाची लक्षणे दिसल्यास तातडीने विलगीकरण करा ः थोरात कोरोना उपाययोजना व आढावा बैठकीत महसूल मंत्र्यांच्या सूचना

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्याची कोरोनाची दुसरी लाट ही भयानक आहे. यामध्येही कोणीही निष्काळजीपणा करू नये. गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करताना घरोघर जाऊन प्रत्येकाची तपासणी करावी. तापासह इतर लक्षणे आढळल्यास तातडीने त्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करावे अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकारी व प्रशासनाला केल्या आहेत.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या संगमनेर तालुक्यातील कोरोना परिस्थिती उपाययोजना व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, सभापती सुनंदा जोर्वेकर, जिल्हा परिषदेच्या समिती सभापती मीरा शेटे, डॉ.हर्षल तांबे, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, विश्वास मुर्तडक, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, सीताराम राऊत, मिलिंद कानवडे, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, डॉ.संदीप कचेरिया, डॉ.राजकुमार जर्‍हाड, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अमृतवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, महेश वाव्हळ आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांसह प्रत्येक पदाधिकार्‍यांनी आपल्या विभागात व प्रभागात अधिक लक्ष देऊन नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे. कोणत्याही कुटुंबांमध्ये एका व्यक्तीला तापाचे किंवा अन्य काही लक्षणे आढळल्यास त्याचे होम क्वॉरंटाईन बंद करून तातडीने संस्थात्मक विलगीकरण करा. प्रशासनातील कर्मचार्‍यांनी घरोघर जाऊन तपासणी केली तर आपल्याला रुग्ण शोधता येतील. या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. घरातील एका व्यक्तीला कोरोणाची लागण झाली असेल तर त्याची ट्रीटमेंट विलगीकरण करून तातडीने करा. जेणेकरून इतरांना त्याची बाधा होणार नाही. कोरोणाची रुग्णसंख्या कमी करणे हेच अत्यंत आवश्यक आहे. राज्य पातळीवर आपण सातत्याने काम करत असून जिल्ह्याकरिता व तालुक्याकरिता ऑक्सिजन व रेमडेसिविर मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मार्ग निघत आहे मात्र वाढणारी रुग्णसंख्या कमी करणे हेच मोठे आव्हान आहे. ज्या गावांमध्ये जास्त रुग्णसंख्या आहे तेथे पोलीस प्रशासनासह सर्वांनी अधिक दक्षतेने काम करावे. गावच्या सर्व कर्मचार्‍यांना सोबत घेऊन पदाधिकार्‍यांनी नागरिकांच्या जागृततेबरोबर रुग्णवाढ आपल्या गावात होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घ्यावी असे आवाहन महसूल मंत्री थोरात यांनी केले आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 115381

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *