दिवाळीनंतर सुरु झालेल्या दुसर्या लाटेची गती खालावली! मात्र शिक्षकांचे स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याचा वेग वाढल्याने चिंतेत भर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात वाढत गेलेल्या कोविड बाधितांच्या संख्येला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. वेगाने रुग्णवाढ होणार्या ग्रामीण क्षेत्रातील सरासरीतही मोठी घसरण नोंदविली आहे. मात्र गेल्या 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्याची प्रक्रीया सुरु झाल्यानंतर स्राव चाचणीतून शिक्षकच बाधित असल्याचे समोर येण्याचा सिलसिला कायम आहे. गुरुवारी शहरातील सात जणांसह एकूण 39 जणांचे स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तब्बल बारा शिक्षक असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गुरुवारच्या रुग्णवाढीने तालुक्याने सहा हजारांचा पल्ला गाठण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकतांना 5 हजार 712 रुग्णसंख्या गाठली आहे. आजच्या स्थितीत त्यातील केवळ 188 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.

दिवाळीनंतर राज्यात कोविड संक्रमणाचा दुसरी विलक्षण लाट येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविली होती. त्यानुसार दिवाळीच्या पूर्वी चार दिवस आधीपासून शहरातील बाजारपेठांमध्ये कोविडचे नियम डावलून मोठ्या संख्येने खरेदीसाठी झालेली गर्दी जाणकारांच्या अंदाजांना बळ देणारी ठरली. त्याचा परिणाम 16 नोव्हेंबरपासून दिसून आला. नोव्हेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत रुग्णवाढीची सरासरी 24.9 होती. 11 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत त्यात भर पडून ती 30.3 वर तर त्यानंतर 21 ते 30 नोव्हेंबर या दहा दिवसांमध्ये थेट 35.7 वर जावून पोहोचली होती. त्यामुळे जाणकारांचा अंदाज एकप्रकारे खरा ठरण्यासोबतच वाढत चाललेली रुग्णसंख्या आता तालुक्याला कुठवर नेवून पोहोचवते याची चिंताही निर्माण झाली होती.

डिसेंबरच्या पहिल्या आठ दिवसांनी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील सरासरी रुग्णगतीत किरकोळ भर घालीत ती 36.25 वर नेल्याने डिसेंबरही तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येचा फुगा फुगवणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र दुसर्या आठवड्याने चिंतेचे मळभ मागे सारतांना सरासरी रुग्णगतीतही मोठी घट निर्माण करतांना 36.25 वरुन थेट 24.89 पर्यंत घसरण घेतली. त्यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र याच दरम्यान राज्यातील शाळा सुरु करण्याची प्रक्रीयाही सुरु झाल्याने प्रत्यक्ष शाळेत येणार्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची चाचणी अनिवार्य केली गेली. पहिल्या टप्प्यात शिक्षकांचे स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण अल्प होते. आता मात्र त्यात वाढ झाल्याचे चित्र दिसत असल्याने शिक्षण संस्थांसह पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारच्या अहवालातून तालुक्यातील विविध ठिकाणच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 12 शिक्षकांचे स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

गुरुवारी प्राप्त झालेल्या एकूण 39 जणांच्या अहवालात शहरातील सात व तालुक्यातील 32 रुग्णांचा समावेश आहे. त्यात शहरातील कुंभार गल्लीतील 32 वर्षीय दोन तरुण, रंगार गल्लीतील 33 वर्षीय तरुण, जनता नगरमधील 40 वर्षीय महिला, चैतन्य नगरमधील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, ताजणे मळ्यातील 19 वर्षीय तरुण व मालदाड रोडवरील 51 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहराच्या एकूण रुग्णसंख्येत गुरुवारी सात नव्या रुग्णांची भर पडून एकूण शहरी रुग्णसंख्या 1 हजार 568 वर पोहोचली आहे. त्यातील 1 हजार 492 (95.15 टक्के) रुग्णांनी आत्तापर्यंत उपचार पूर्ण केले असून या कोविडने 15 (0.96 टक्के) संगमनेरकरांचा बळीही घेतला आहे.

दुसरीकडे तालुक्यातील जवळे कडलग येथील 50 वर्षीय इसमासह 38, 35 वर्षीय दोन व 34 वर्षीय तरुण, आश्वी खुर्दमधील 54 वर्षीय इसम, हिवरगाव पठारवरील 45 वर्षीय महिला, मंगळापूर येथील 40 वर्षीय तरुण, झोळे येथील 65 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 30 वर्षीय दोन तरुण, पारेगाव खुर्द येथील 38 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 65 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्दमधील 50 वर्षीय इसम, संगमनेर खुर्दमधील 45 वर्षीय तरुण, निमगाव बु. येथील 41 व 18 वर्षीय तरुण, घुलेवाडी शिवारातील मालपाणी नगरमधील 16 वर्षीय मुलगा.

राजापूर येथील 57, 49, 46 व 45 वर्षीय इसम, चिकणी येथील 50 व 42 वर्षीय महिलांसह 40 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 50 व 47 वर्षीय महिलांसह 31 वर्षीय तरुण, अकलापूर येथील 40 व 36 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 56 वर्षीय इसम व चनेगाव येथील 47 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. गुरुवारच्या (ता.17) अहवालातून ग्रामीण रुग्णसंख्येत 32 जणांची भर पडल्याने ग्रामीण रुग्णसंख्या 4 हजार 144 वर पोहोचली आहे. त्यातील 3 हजार 986 (96.19 टक्के) रुग्णांनी उपचार पूर्ण करुन घर गाठले आहे, तर 31 जणांना दुर्दैवाने आपले प्राण गमवावे लागले आहेत. या रुग्णवाढीने तालुक्यातील बाधित संख्या सहा हजार रुग्णसंख्येच्या दिशेने पुढे सरकत 5 हजार 712 रुग्णांवर जावून पोहोचली आहे.

सद्य स्थितीत संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 5 हजार 712 झाली आहे. त्यात शहरी रुग्णसंख्या 1 हजार 568 (27.45 टक्के) इतकी तर ग्रामीण रुग्णसंख्या 4 हजार 144 (72.55 टक्के) इतकी आहे. शहरातील 1 हजार 492 तर ग्रामीण भागातील 3 हजार 986 रुग्णांनी आत्तापर्यंत उपचार पूर्ण केले असून आजच्या स्थितीत तालुक्यात केवळ 188 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याच्या सरासरीतही समाधानकारक वाढ होवून आता 96 टक्के रुग्ण बरे होत असल्याचे मागील आकडेवारीतून समोर आले आहे.

