उपशाखाधिकार्‍यानेच लाटले ग्राहकांचे दीड लाख रुपये!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरातील गणेशनगर परिसरात असलेल्या ‘इक्विटास स्मॉल फायनान्स’ या आर्थिक संस्थेद्वारा कर्ज घेतलेल्या ग्राहकांकडून कर्जाची रक्कम जमा करुन ती संस्थेत भरणा न करता परस्पर तिचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित संस्थेच्या शाखाधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहरातील भरीतकर मळा परिसरात राहणार्‍या राहुल बाळासाहेब गोडसे या संशयितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताने खासगी पतपुरवठा करणार्‍या खासगी संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरातील गणेशनगर परिसरात ‘इक्विटास स्मॉल फायनान्स’ ही पतपुरवठा करणारी संस्था आहे. वस्तू अथवा अन्य गोष्टींची खरेदी करण्यासाठी या संस्थेकडून ग्राहकांना पतपुरठा केला जातो व नंतर मासिक हप्त्यांच्या स्वरुपात तो वसुल केला जातो. त्यासाठी कर्ज घेणार्‍या ग्राहकांचे संस्थेत बचत खाते (सेव्हींग अकाऊंट) उघडले जाते व त्यांच्याकडून जमा होणारे मासिक हप्त्यांचे पैसे त्यात जमा केले जातात अशी संस्थेची कामकाजाची पद्धत आहे. या शाखेत कुणाल प्रदीप मेहता हे शाखाधिकारी म्हणून तर राहुल बाळासाहेब गोडसे हा उपशाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

मागील महिन्यात संस्थेचा उपशाखाधिकारी असलेल्या राहुल गोडसे याने ग्राहकांनी 27 मे पासून आजवर कर्जाच्या बदल्यात संस्थेत 1 लाख 54 हजार 258 रुपये जमा केले. मात्र आरोपीने त्यातील एक रुपयाही संस्थेत अथवा संबंधित ग्राहकांच्या बचत खात्यात जमा न करता आपल्या आर्थिक फायद्यासाठी परस्पर त्याची विल्हेवाट लावून या रकमेचा अपहार केला. सदरची बाब लक्षात आल्यानंतर शाखाधिकारी मेहता यांनी संबंधिताला वारंवार अपहार केलेली रक्कम जमा करण्यास सांगितले. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मंगळवारी अखेर त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताने संगमनेर परिसरातील खासगी पतपुरवठा करणार्‍या संस्थांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 116716

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *