लोणी खुर्दमध्ये ग्रामपंचायतकडून जंतूनाशक औषध फवारणी
नायक वृत्तसेवा, राहाता
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायतच्यावतीने संपूर्ण गावासह वाड्या-वस्त्यांवर जंतूनाशक औषध फवारणी सुरू आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये म्हणून जनजागृती देखील करण्यात येत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच जनार्दन घोगरे यांनी केले आहे.
लोणी खुर्द गावात कोरोनोचा फैलाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने सोडियम हायपोक्लोराईड औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची ग्रामपंचायतकडून अंमलबजावणी होत आहे. बुधवारचा जनावरांचा बाजार, भाजीपाला बाजार बंद असून शनिवार व रविवार तसेच बुधवार यादिवशी अत्यंत कटाक्षाने ‘जनता कर्फ्यू’ पाळला जातो. विशेष म्हणजे कोरोनो थैमानाचे गांभीर्य लक्षात घेता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरपंच जनार्दन घोगरे हे गावात ठिकठिकाणी स्वतः ट्रॅक्टर ब्लोअर चालवून जंतूनाशक औषध फवारणी करत आहे. जवळपास संपूर्ण गावासह वाड्या-वस्त्यांवर फवारणी करण्यात आलेली आहे. तरी देखील ज्या भागात राहिली असेल तेथेही करण्यात येणार आहे. मात्र, नागरिकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच घोगरे यांनी केले आहे.
पंचवीस हजाराच्या आसपास लोकसंख्या व राहाता तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या लोणी खुर्दचे विद्यमान सरपंच जनार्दन घोगरे हे उच्चशिक्षित असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होवून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेले सरपंच आहेत. सर्व सामाजिक जबाबदारी, लोकाभिमुख दायित्वाचा अनुभव त्यांच्या पाठिशी असल्याने नागरिकांमधून त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे.