विघ्नहर्ता लॉन्स येथे पाचशे खाटांचे कोविड सेंटर सुरू महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांकडून रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने अहमदनगर रस्त्यावरील विघ्नहर्ता लॉन्स येथे पाचशे खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले आहे. नुकतीच कोविड सेंटरला भेट देऊन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
यावेळी समवेत आमदार डॉ.सुधीर तांबे, विघ्नहर्ता लॉन्सचे संचालक राजेंद्र कुटे, युवक शहराध्यक्ष निखील पापडेजा, एनएसयूआयचे गौरव डोंगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप आदी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन रुग्णांच्या सोयीसाठी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विघ्नहर्ता लॉन्स येथे अद्ययावत व चांगल्या दर्जाच्या सुविधा असलेल्या 500 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यामध्ये महिलांकरिता 200 तर पुरुषांकरीता 300 बेड राखीव आहेत.
कोरोनाची दुसरी मोठी लाट आहे. यामध्ये कोणीही निष्काळजीपणा करू नये. प्रशासनाला आपण सूचना केल्या असून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेले रुग्ण लवकर लक्षात येऊन त्यांच्यावर संस्थात्मक विलगीकरणातून तातडीने उपाय करणे सोयीचे होणार आहे. यामुळे इतरांना त्याची बाधा होणार नाही. सध्या सर्वत्र ऑक्सिजन व रेमडेसिविर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आपण ऑक्सिजन मिळवण्यासाठी सातत्याने काम करत आहोत. मात्र कोरोना रुग्णवाढ रोखणे हाच त्यावर सर्वोत्तम पर्याय आहे. संगमनेर शहरामध्ये घरोघर केलेल्या तपासणीला मोठे यश आले असून त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाली आहे. हाच फॉर्म्यूला ग्रामीण भागामध्येही सुरू करण्यात आला असून प्रशासन व पदाधिकार्यांना तशा सूचना करण्यात आल्या असल्याचे महसूल मंत्री थोरात यांनी नमूद केले. कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदिंनी अगदी तातडीने अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परिश्रम घेतले.