तमाशा फडाला शिर्डीतून एक लाख रुपयांची मदत

नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबांच्या शिर्डीतून तमाशा कलावंत जगला पाहिजे म्हणून गेल्या 75 वर्षांपासून रामनवमीची परंपरा जपणारे रघुवीर खेडकर यांच्या तमाशा फडातील कलावंत व कामगारांना मदत म्हणून एक लाख रुपये नुकतेच रोख स्वरुपात देण्यात आले.

श्री साईबाबा हयात असताना स्वतः कलावंतांची कदर करायचे व मानधन द्यायचे. श्रीरामनवमी यात्रा कोरोनामुळे यावर्षी देखील रद्द झाली आहे. त्यामुळे श्रीरामनवमी यात्रा समितीचे अध्यक्ष केशव गायके यांचे वस्तीवर छोटीशी बैठक घेऊन त्यामध्ये रघुवीर खेडकर यांनी गेल्या 4-5 वर्षांपासून कधीही मानधनाची रक्कम ठरवलेली नाही. जे द्याल तो बाबांचा प्रसाद समजून स्वीकारील अशी भूमिका घेतलेली आहे. नुकतेच एबीपी माझाच्या कट्ट्यावर त्यांची व्यथा व हालअपेष्टा ऐकल्याने सर्वांच्या सहमतीने निर्णय घेण्यात आला की, रामनवमी यात्रेतील मागील 2 वर्षांपूर्वीच्या शिल्लक रकमेतून एक लाख रुपये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे नुकतीच ही मदत देण्यात आली. यावेळी रघुवीर खेडकर यांनी ही रक्कम नसून श्री साईबाबांचा प्रसाद असून आमच्या 130 लोकांच्या कुटुंबाला मोठा हातभार मिळाला असल्याची भावना व्यक्त करुन मंदिराच्या कळसासमोर नतमस्तक झाले. याप्रसंगी केशव गायके, शिवसेना नेते कमलाकर कोते, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कैलासबापू कोते, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, सुजित गोंदकर, खजिनदार बाळासाहेब लुटे व प्रमोद गोंदकर उपस्थित होते.
