नरभक्षक बिबट्याला तत्काळ ठार करण्याचे आदेश! संतप्त नागरिकांचा महामार्गावर ठिय्या; माजीमंत्री बाळासाहेब थोरातांची शिष्टाई..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
वारंवार तक्रारी केल्यानंतरही वनविभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अवघ्या महिनाभरातच तालुक्यातील निमगाव टेंभी आणि त्यालगतच्या देवगावमधील दोन महिलांचा बळी गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग रोखून धरीत आपला रोष व्यक्त केला. यावेळी आंदोलन स्थळावरुन जाणार्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मोबाईलवरुन संवाद साधून बिबट्यांची संख्या आणि येथील वनविभागाचा हलगर्जीपणा त्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी नरभक्षक झालेल्या बिबट्याला तत्काळ ठार मारण्याचे आदेश दिले. या नंतरही वनविभागाबाबतची नाराजी कायम असल्याने आंदोलक मागे हटायला तयार नव्हते, मात्र माजीमंत्री थोरात यांनी शिष्टाई केल्याने अखेर जवळपास दोनतास सुरु असलेले हे आंदोलन थांबवण्यात आले.
शुक्रवारी (ता.11) सायंकाळी सहाच्या सुमारास देवगावजवळील पानमळा परिसरात सदरची दुर्दैवी घटना घडली होती. या परिसरात आकाश पानसरे हे दूध उत्पादक शेतकरी वास्तव्यास असून पानमळा परिसरात त्यांची शेतजमीन आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांची पत्नी योगिता (वय 38) या मका कापण्यासाठी रानात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत अन्यही काही महिला मका कापणीचे काम करीत होत्या. त्याचवेळी मक्यात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घालीत त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. हा प्रकार पाहुन अन्य महिलांनी ओराडाओरड केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. त्यानंतर जखमी महिलेला सुरुवातीला खासगी आणि नंतर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
धक्कादायक म्हणजे अवघ्या महिन्याभरापूर्वी 11 सप्टेंबररोजी देवगावलगतच्या निमगाव टेंभीमधील वर्पे वस्तीवरही अशीच घटना घडली होती. त्यावेळी घराच्या बाहेर धुणे धुणार्या संगिता शिवाजी वर्पे (वय 40) या महिलेवर बाजूच्या गीन्नी गवताच्या रानात दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला करीत त्यांना जवळपास 25 फूट ओढून नेले होते. त्या घटनेत सदरील महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. संतापजनक बाब म्हणजे ही घटना घडण्यापूर्वी दीड महिना अगोदर याच गावात अंगणात खेळणार्या दीड वर्षीय चिमुरडीवरही वाघाने हल्ला केला होता. त्यात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.
त्या घटनेनंतर निमगाव टेंभीतील ग्रामस्थांनी नरभक्षक झालेल्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी संगमनेरच्या वनविभागाकडे केली होती. मात्र मानवी जीवाचे कोणतेही सोयरसुतक नसलेल्या आणि केवळ जंगलातील लाकडं आणि त्यांच्या मिल यांच्याभोवतीच फिरणार्या या विभागाने चिमुरडीवरचा हल्ला गांभीर्याने घेतला नाही. त्याचा परिणाम अवघ्या दीड महिन्यातच बिबट्याने पुन्हा मानवावर हल्ला करीत चाळीस वर्षीय महिलेचा बळी घेतला. त्यावेळी परिसरातील नागरिक प्रचंड संतप्त झाले होते. मात्र वनविभागाच्या अधिकार्यांनी त्यांना खोटी आश्वासने देत वेळ मारुन नेली.
त्याच्या याच हलगर्जीपणामुळे नरभक्षक झालेल्या बिबट्याने अवघ्या महिनाभरात पुन्हा देवगाव परिसरातील शेतावर काम करणार्या योगिता पानसरे या अडतीस वर्षीय महिलेला लक्ष्य केले आणि पाठीमागून हल्ला करीत त्यांचा जीव घेतला. लागोपाठच्या या घटनांमुळे या संपूर्ण पंचक्रोशीत नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झालेली असतानाही आपल्याच उद्योगांमध्ये व्यस्त असलेल्या वनविभागाने देवगावमधील या घटनेनंतर लोकांनी केलेले फोनही घेतले नाहीत. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीखाली वावरणार्या पंचक्रोशीतील नागरिकांच्या संतापाचा आज उद्रेक झाला.
देवगाव व निमगांव टेंभीसह आसपासच्या अनेक गावांतील नागरिकांनी आज सकाळी शहरातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरणे फाट्यावर रास्तारोको आंदोलन पुकारले. अचानक सुरु झालेल्या या आंदोलनाने महामार्गावरुन शहरात दाखल होणार्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला. पोलिसांनी पर्यायी मार्ग म्हणून वनविभागाच्या संगमनेर खुर्दमधील कार्यालयाजवळील प्रवरेवरील छोट्या पुलावरुन वाहतूक वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा रस्ता खूपच अरुंद असल्याने काही वेळातच तो देखील वाहनांनी तुंबला. त्यामुळे वाहनचालकांना जवळपास दोनतास कोंडीत अडकून पडावे लागले.
या दरम्यान माजीमंत्री बाळासाहेब थोरात तेथून जात असताना त्यांनी आपले वाहन थांबवून आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी संतप्त आंदोलकांनी ‘सरकारला वाघ प्रिय असतील तर त्यांनी आम्हाला मारुन टाकावे आणि वाघांना पाळावे’ अशा शब्दात आपला रोष व्यक्त केला. यावेळी अनेकांनी बिबट्याच्या तक्रारी करण्यासाठी वनविभागाला फोन केल्यानंतर फोन देखील घेतले जात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देत वनाधिकार्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली. हजारोंच्या संख्येने जमलेल्या समुदायाच्या तीव्र भावना लक्षात घेवून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला.
यावेळी त्यांनी पोलीस वाहनाच्या माईकचा वापर करुन वनमंत्र्यांशी सुरु असलेला संवाद उपस्थित आंदोलकांनाही ऐकवला. या परिसरात सातत्याने बिबटे माणसांवर हल्ले करीत असल्याचे आणि अवघ्या महिनाभरातच दोन महिलांचा बळी घेतल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आणून देत नरभक्षक झालेल्या बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यावर मंत्री मुनगंटीवार यांनी माईकवर जाहीरपणे नरभक्षक झालेल्या बिबट्याला तत्काळ ठार मारण्याचे तोंडी आदेश दिले. याबाबतचे लेखी आदेश आज सुट्टी असतानाही काही वेळातच दिले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी थोरात यांनी नरभक्षकासह या परिसरात बिबट्यांची संख्या अधिक असल्याने त्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यावर त्यांनी बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे लावण्याची व त्यांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्याची तयारी दाखवली. फोनवर प्रतिसाद न देणार्या अधिकार्यांच्या निलंबनाच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष करीत त्यांनी राज्यासाठी असलेल्या जलद प्रतिसाद दलाचा क्रमांक बिबट प्रवण क्षेत्रातील सर्व गावांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश स्थानिक अधिकार्यांना दिले. त्यानंतर माजीमंत्री थोरात यांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर जवळपास दोनतास सुरु असलेले आंदोलन अखेर आटोपते घेण्यात आले.
गेल्या अडीच महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात तालुक्यातील निमगाव टेंभी आणि देवगाव परिसरातील एका चिमुरडीसह दोघा महिलांचे बळी गेले आहेत. वास्तविक बिबट्याने दीड महिन्यांपूर्वी निमगांव टेंभीतील चिमुरडीवर हल्ला केल्यानंतर वनविभागाने तेव्हाच नरभक्षक झालेल्या ‘त्या’ बिबट्याला ठार मारण्याची मोहीम सुरु करणे आवश्यक होते. मात्र केवळ जंगलातील लाकडं आणि मिलचे मालक यांच्यातच व्यस्त असलेल्या या विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या महिन्यात 11 सप्टेंबररोजी निमगांव टेंभीतील संगिता शिवाजी वर्पे या चाळीसवर्षीय महिलेचा बळी गेला. तेव्हाही या विभागाने दुर्लक्ष केले, त्याचा परिणाम ऐन दसर्याच्या पूर्वसंध्येला देवगावमधील योगिता आकाश पानसरे या अडतीस वर्षीय महिलेला या जीव द्यावा लागला. या दोन्ही घटना वनाधिकार्यांच्या हलगर्जीपणातून घडल्याने त्यांचे निलंबन करुन त्यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची आणि दोन्ही मृत्यूचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे.