मा.पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांना दैनिक नायकचे अनावृत्त पत्र..

मा.महोदय,
सध्या संपूर्ण जिल्हा कोविडच्या संक्रमणाने भयग्रस्त आहे. जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने दररोज रुग्णांची संख्या उच्चांक गाठीत आहे. अशावेळी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांवरील ताण अनेक पटींनी वाढला आहे. शेकडों रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत कृत्रिम ऑक्सिजनच्या भरवशावर जिवंत आहेत. रोजच्या रुग्णवाढीने जिल्ह्यातील रुग्णालये फुल्ल झाली असून उपचारांसाठी रुग्णांना ‘वेटींग’वर थांबावे लागत आहे. वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने अथवा पुरवठा खंडीत झाल्याने अनेकांचे जीव गेल्याच्या घटना अलिकडच्या काळात समोरही आल्या आहेत. देशभरातून एकाचवेळी मागणी वाढल्याने ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर लशीसह अन्य काही औषधांचा तुटवडा निर्माण झाला. त्यावर मात करण्यासाठी प्रशासन रात्रीचा दिवस करीत आहे. आरोग्य यंत्रणेतील पांढर्या वेशातील देवदूत आपल्या परिने शर्थ करीत शक्य तितके जीव वाचवण्याचे प्रयत्न करीत आहेत.

राज्यातील संसर्गाची साखळी खंडीत व्हावी यासाठी शासनाने राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यातच आता जिल्हाबंदी आदेशही लागू असल्याने कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासह संपूर्ण पोलीस दलावर कोविड रोखण्याची मोठी जबाबदारी आली आहे. देशातील जनता गेल्या तेरा महिन्यांपासून कोविड आणि त्या अनुषंगाने लागू असलेल्या नियमांचे पालन करीत आहे. ज्यांच्याकडून नियमभंग होत आहे त्यांच्याकडून आपल्या विभागाला अनुपालनही करुन घ्यावे लागत आहे. प्रसंगी काही ठिकाणी कठोर भूमिका घेवून नियमांची अंमलबजावणी करणं हा पोलिसांच्या कार्यपद्धतीचा भागच आहे. गेल्या वर्षभरापासून पोलिसांनी शासनाने ठरवून दिलेल्या सर्व जबाबदार्या पूर्ण केल्या आहेत. त्यासाठी प्रसंगी 18 ते 20 तास कामही केले आहे. तुमच्या या समर्पित सेवेमुळे शेकडोंचे जीवही वाचले असतील आणि शेकडोंना उपचारही मिळाले असतील.

सध्याचा संसर्ग अधिक घातक आणि जीवघेणा आहे. जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यातील स्मशानात दररोज एकतरी अंत्यसंस्कार कोविड बाधिताचा आहे. जलद प्रादुर्भावामुळे रोज उच्चांकी रुग्ण समोर येत आहेत, त्यातील अधिक संक्रमित झालेल्यांची संख्या जास्त असल्याने जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांमधील ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी वाढल्याने आवश्यक असलेला ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळेही मोठी समस्या निर्माण झाली आहे. दूरवरुन येणारे टँकर परस्पर कोणी नेवू नये म्हणून दुसर्या जिल्ह्यातून ते सहिसलामत आणण्याचे दिव्यही ठिकठिकाणचे पोलीस पार करीत असल्याचे चित्र दिसत आहे. या संपूर्ण घटनाक्रमात आपण जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा पदभार घेतल्यापासून दिवस-रात्र आहात. आपण स्वतःही त्यातून बाहेर पडला आहात, आणि पुन्हा शड्डू ठोकून मैदानातही उतरला आहात. संकटाच्या या कालावधीत आपल्या नेतृत्त्वाखालील सर्व तालुक्यांमधील अधिकार्यांनी आपापली भूमिका चोख बजावली. या दरम्यान काहींनी चुका केल्या, काहींकडून झाल्या त्याची दखलही आपण घेतली आणि सबंधितांवर कारवाई केली.

अशातच शेवगावमधील घटना आणि त्या नंतर त्याची जाणीव करुन देणार्या पत्रकारालाच जाब विचारण्याचा प्रकार समोर आला. खरंतर पत्रकार आणि पोलीस अधिकारी यांच्या संबंधात पत्रकाराच्या स्वभावानुसार परिणाम असतात. याची पोलीस दलातील अधिकारी आणि पत्रकार दोहींना जाणीव असते. गेल्या सोमवारी शेवगावमध्ये घडलेली घटना हेच सांगते. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असतांना जिल्ह्याला आवश्यक पुरवठा झाला नाही. आपले वास्तव्य असलेल्या अहमदनगरमध्ये उद्भवलेला प्रसंग तर आपण प्रत्यक्ष अनुभवलाच आहे. बंद पडलेला टँकर लवकरात लवकर रुग्णालयांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी आपल्यासह यंत्रणेतील घटकांनी केलेले प्रयत्न अवघ्या जिल्ह्याने पाहीले आहेत. मात्र त्याचवेळी आपल्याच नियंत्रणाखालील शेवगावमध्ये याविरुद्ध गोष्ट घडावी हे न उलगडणारं कोडं आहे.

शेवगावची पत्रकार मंडळी म्हणते श्रीसंत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयात त्यावेळी 90 रुग्ण दाखल होते. सर्व गोष्टींची पूर्तताही वाहन चालकाने केली होती असे सांगीतले जात आहे. सदरच्या वाहनाची चौकशी करण्याचा अधिकार श्री.प्रभाकर पाटील यांना आहेच. त्यांनी जे केलं ते योग्यच होतं. मात्र वाहनात ऑक्सिजन आहे, आणि ते एका रुग्णालयासाठी चालले आहे हे समजल्यावर तर त्यांच्यातला माणूस जागायला हवा होता? पण तसे झाले नाही. त्यानंतरही संबंधिताने तो कोठून आणला त्याच्याकडे आणि जेथे चालला त्या व्यवस्थापनाकडे चौकशी केली असती तरी मान्य. मात्र हे सगळं न करता साहेब ‘ज्याला गरज असेल तो माझ्या पोलीस ठाण्यात येईल आणि सिलेंडर घेवून जाईल’ अशी भूमिका त्यांनी स्विकारली. प्रकरणाचं गांभिर्य अपघातग्रस्त होवून रुग्णालयात पोहोचलेल्या इन्सीडेंट कमांडर तथा शेवगावच्या तहसील अर्चना पागीरे यांना समजले आणि त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांशी पत्रव्यवहार करुन सदरचे ऑक्सिजन सिलेंडर श्रीसंत एकनाथ आयुर्वेद रुग्णालयाला पोहोच करण्यास सांगीतले, तेव्हा दोन दिवसांनी ते रुग्णापर्यंत पोहोचले. या दरम्यान रुग्णालयात ऑक्सिजनची आणीबाणी झाली असती तर?

हा सर्व प्रकार समजल्यानंतर शेवगावचे पत्रकार सचिन सातपुते यांनी घडल्या प्रकारावर प्रकाश टाकण्याचे पत्रकारितेचे कर्तव्य बजावले. मात्र त्यातून कर्तव्यातच चुकलेल्या आणि तरीही चिडलेल्या पाटील साहेबांचा ईगो दुखावण्यात झाला. त्यांनीं सोशल समुहातच त्या पत्रकारालाच ‘चुकीचा’ ठरवून आपण साव असल्याचे परस्पर सिद्ध केले. या सगळ्या घटनेची दखल घेवून अनेक वृत्तपत्रांनी यामागील वास्तवही समोर आणलं. आपण कडक शिस्तीचे पोलीस अधिकारी आहात असा जिल्हावासियांचा अनुभव आहे. यापूर्वी कर्तव्यात कसूर झालेल्या अथवा चुकलेल्या अर्धा डझन अधिकार्यांवर आपण कारवाईचा बडगा उगारला आहे. कोपरगावचे गवळी असतील, नेवाशाचे डेरे असतील, राहुरीचे देशमुख असतील किंवा संगमनेरचे परमार असतील. आपण शिस्तीची सुट कोणालाच दिल्याचे दिसले नाही. शेवगाव प्रकरणात मात्र आपल्याकडून विलंब होतोय असाच येथील सामान्य नागरिकांमधला सूर आहे. एकीकडे प्राणवायु रोखला जातोय तर दुसीकडे मटका, वाळु, दारु या पारंपारिक धंद्यांसह आता जुगारीचे नामी फडांमध्ये कोविडच्या संकटातही रंग भरीत आहेत. संपूर्ण जिल्हा पोलीस दल कोविडशी लढण्यात आघाडीवर असतांना ही घटना त्याला गालबोट लावते. न्याय सर्वांना समानच असला पाहीजे, तो होईल अशी अपेक्षा..
धन्यवाद..!

