..आणि म्हाळुंगी नदीच पेटली..! संपूर्ण पात्रात आगीच्या ज्वाळा; प्रशासनाला खबरच नाही; निर्बंध झुगारुन बघ्यांनी केली मोठी गर्दी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधी नव्हे ती अघटित घटना आज अकोले रस्त्यावरील म्हाळुंगी नदीपात्रात घडली. रात्री आठच्या सुमारास अकोले रस्त्यावरील पुलापासून साईनगरपर्यंतच्या भागात नदीपात्रातून आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा पाहून रस्त्याने जाणारे-येणारे भीतीनेच थबकले. हा प्रकार विकृतीतून घडल्याचेही स्पष्ट झाले असले, तरी प्रशासनाला मात्र अजूनपर्यंत या घटनेचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे नदीने पेट घेतल्याचे अनोखे वृत्त ऐकून अनेक बघ्यांनी निर्बंध झुगारीत म्हाळुंगी नदीपात्रालगत गर्दी केली होती.

मागील दोन दिवसात अकोले रस्त्यावरील पुलापासून ते साई मंदिर रस्त्यावरील पुलापर्यंतच्या पात्रात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत नदीपात्रातील कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तर झाडेझुडपे, काटेरी बाभळी आदींच्या राशी उभ्या करण्यात आल्या होत्या. आज दिवसभरात परिसरातील नागरिकांनी त्यातील बऱ्याच काड्या, लाकडं जळणासाठी म्हणून नेल्या. मात्र बाकीचा कचरा आणि झुडूपं गेल्या दोन दिवसांपासून पात्रातच पडून असल्याने कडक उन्हात पडून राहील्याने तो वाळला. आज रात्री आठच्या सुमारास नदीपात्रालगत ‘नरिमन पॉइंटचा’ आनंद घेत दारु रिचवणाऱ्या तळीरामांना नशेचा अंमल चढल्यावर त्यांच्यातील विकृती जागली.

आणि स्वच्छता मोहिमेअंतर्गत पात्रात जागोजागी गोळा करून ठेवलेले कचऱ्याचे ढीग पेटवून देण्यात आले. त्यामुळे संपूर्ण नदीपात्रास आग लागल्यासारखे दृष्य दिसू लागले. पात्रातून आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा उठू लागल्याने आकाशात धुराचे लोळ उठले होते. ते पाहून अनेकांनी निर्बंध झुगारीत नदीपात्राच्या दिशेने धाव घेतली. कधी नव्हे ती घटना घडताना पाहून अनेक जणांनी कोविडच्या नियमांचीही पायमल्ली केली. प्रशासनाला मात्र तासभर या घटनेची खबर मिळाली नाही हे विशेष.

Visits: 183 Today: 2 Total: 1112682
