शिर्डीत श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 29 ते 31 मार्चपर्यंत उत्सव; संस्थानकडून उत्सवाची जय्यत तयारी


नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबा संस्थानच्यावतीने बुधवार 29 ते शुक्रवार 31 मार्च 2023 या काळात श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

29 मार्चला पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती, पहाटे 5.45 वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, 6 वाजता द्वारकामाईत साईसच्चरित्राचे अखंड पारायण, 6.20 वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 7 वाजता श्रींची पाद्यपूजा, दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी 4 ते सायंकाळी 6 यावेळेत समाधी मंदिराशेजारील व्यासपीठावर कीर्तन होणार आहे. सायंकाळी 6.30 वाजता धुपारती होईल. रात्री 7.15 ते 9.30 यावेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम होणार असून रात्री 9.15 वाजता चावडीत श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक परत आल्यानंतर रात्री 10.30 वाजता शेजारती होईल. यादिवशी पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे.

गुरुवार 30 मार्चला पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती, पहाटे 5.45 वाजता अखंड पारायणाची समाप्ती होऊन श्रींच्या फोटो व पोथीची मिरवणूक होईल. सकाळी 6.20 वाजता कावडीची मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 7 वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी 10 ते 12 यावेळेत समाधी मंदिराशेजारील व्यासपीठावर श्रीरामजन्म कीर्तन कार्यक्रम, दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती होणार आहे. दुपारी 4 वाजता निशाणांची मिरवणूक तर सायंकाळी 5 वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता धुपारती होणार आहे.

रात्री 7.15 ते 9.15 यावेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम होणार असून रात्री 9.15 वाजता श्रींची गुरुवारची नित्याची पालखी मिरवणूक होणार आहे. रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत श्रींसमोर इच्छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. तसेच हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. यामुळे 30 मार्चला नित्याची शेजारती व 31 मार्चला पहाटेची काकड आरती होणार नाही. उत्सवाच्या सांगता दिनी शुक्रवार 31 मार्चला पहाटे 5.05 वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 6.50 वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी 7 वाजता गुरुस्थान मंदिरामध्ये रुद्राभिषेक, सकाळी 10 वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.10 वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी 6.30 वा. धुपारती होईल. रात्री 7.15 ते 9.30 यावेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम होणार असून रात्री 10 वाजता श्रींची शेजारती होणार आहे. हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, संजय जोरी, कैलास खराडे, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

Visits: 140 Today: 1 Total: 1111326

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *