समाज माध्यमांवर गरळ ओकण्याचा प्रयत्न खेदजनक! कोरोना आढावा बैठक गोंधळावरुन आमदार लहामटेंनी मांडली भूमिका
नायक वृत्तसेवा, अकोले
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकोले तालुक्यासाठी कायमच मोठे योगदान आहे. ते नाकारता येणार नाही, पण सध्या समाज माध्यमांत आमच्या दोघांच्या विरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो अतिशय खेदजनक आहे, असे मत आमदार डॉ.किरण लहामटे यांनी व्यक्त केले.
मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अकोले येथील आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रवी मालुंजकर यांनी गोंधळ घातल्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. याबद्दल आमदार डॉ.लहामटे यांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तालुक्यातील नेते मंडळींनी पत्रकार परिषद घेत आमदार लहामटे यांच्यावर टीका केली होती. या संदर्भात लहामटे यांनी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते स्वतःच्या नेत्यांच्या समर्थनार्थ सध्या एकमेकावर समाज माध्यमांत तुटून पडले आहेत. त्यामुळे सध्या संगमनेर-अकोले असा दुजाभाव केला जात असल्याबद्दल आमदार लहामटे यांनी खंत व्यक्त केली.
आमदार डॉ.लहामटे म्हणाले, बाळासाहेब थोरात हे अकोले तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांचा आणि माझा येण्याच्या अगोदरच संपर्क झाला होता. त्यांनी अकोले तालुका असेल किंवा संगमनेर तालुका असेल असा कधी दुजाभाव केला नाही. अकोले तालुक्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचीही ग्वाही थोरात यांनी दिली आहे. त्या आढावा बैठकीत जो गोंधळ झाला. याचे मी नक्कीच समर्थन करणार नाही. त्या व्यक्तीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या, पण त्या व्यक्त करण्याची पध्दत नक्कीच चुकली होती. त्याबद्दल मी त्यांना समजही दिली आहे. आणि त्याविषयी थोरात यांच्याशीही मी चर्चा केली आहे. तरी काही नेते व कार्यकर्ते त्या प्रकरणाला वेगळे वळण देत आहेत. हे खूप क्लेशदायक आहे. माझी काम करण्याची पद्धत जनतेत जाऊन त्यांना मदत करण्याची असल्याने हे काहींना पटणारे नाही. पण सध्या चालू असलेला कठीण काळ बघता मी कोणत्याही गोष्टीचे राजकारण करणार नाही. मला प्रथम तालुक्यातील जनतेचे आरोग्य महत्वाचे आहे. तरी कुणीही चुकीच्या पद्धतीने राजकारण करू नये, असे आवाहन आमदार डॉ.लहामटे यांनी केले आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणत्याही प्रकारचा अकोले तालुक्याविषयी दुजाभाव केला नाही, कारण ते राज्याचे नेते आहेत. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी कोणतेही चुकीचे संदेश समाज माध्यमांत फिरवू नये.
– डॉ.किरण लहामटे (आमदार, अकोले)