राहाता व कोपरगाव मतदारसंघाच्या पालकांवर नागरिकांकडून नाकर्तेपणाचा शिक्का!
राहाता व कोपरगाव मतदारसंघाच्या पालकांवर नागरिकांकडून नाकर्तेपणाचा शिक्का!
दोन्ही मतदारसंघाच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातल्याने चर्चा
अक्षय काळे, कोपरगाव
गेल्या पन्नास वर्षांपासून राहाता, कोपरगाव मतदारसंघाची अविरत सत्ता भोगणार्या नेत्यांना पाणी व रस्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना साकडे घालावे लागणे म्हणजे त्यांनी आपल्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब केला आहे अशी जोरदार चर्चा मतदारसंघातील नागरिकांमध्ये सुरू आहे.
गोदावरी डावा व उजवा कालव्याच्या पाणी नियोजन बैठकीचे आयोजन कोपरगाव व राहाता तालुक्यात करण्यात आले होते. या दोन्ही बैठकीमध्ये कोपरगाव तालुक्यातील विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली तर राहाता येथील बैठकीत देखील शिर्डी मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी हीच मागणी केली. तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सात आवर्तने मिळावी अशी मागणी केली.
कोपरगाव व राहाता तालुक्यातील सत्ता गेल्या पन्नास वर्षांपासून काळे, कोल्हे व विखे कुटुंबात आहे. या तिन्ही कुटुंबांना राज्यात व देशाच्या मंत्रिमंडळात संधी मिळालेली आहे. तसेच साखर कारखाने, जिल्हा बँका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्ता यांच्याच ताब्यात आहेत. ही तिन्ही कुटुंबे पश्चिमेला समुद्रात जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोर्यात वळवावे म्हणून मागणी करत आहे. मात्र एकेकाळी सुजलाम सुफलाम असलेले गोदावरी खोरे आता उजाड झाले असून अनेक सधन शेतकरी पाण्याच्या नियोजनाअभावी देशोधडीला लागले आहेत. याउलट या एकाच आश्वासनावर या घराण्यातील तिसरी पिढी सत्ता उपभोगत आहेत असे असताना या राजकीय नेत्यांनी पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेला वळवावे म्हणून आत्तापर्यंत कोणता आराखडा शासनाला दिला? त्यावर कोणती कारवाई झाली, निळवंडे धरण व त्याचे काम कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत आहे.
याउलट गेल्या पंधरा वर्षांपूर्वी येवला मतदारसंघात आलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मतदारसंघाच्या विकासात पाणी व रस्त्याच्या निर्मितीचे राज्याला दिशादर्शक असे आदर्श मॉडेल उभे केले. मांजर पाडाचे पाणी मतदारसंघात आणण्याचे स्वप्न साकार केले. मात्र पन्नास वर्षात कोपरगाव व राहाता तालुक्यातील नेत्यांनी केवळ आश्वासने व भूलथापा देऊन तालुक्यातील जनतेची एक तर दिशाभूल केली किंवा आपण हे सर्व प्रश्न सोडवण्यास अकार्यक्षम आहोत हे शिक्कामोर्तब केले.
गेल्या तीन महिन्यांपासून गोदावरी नदी दुथडी वाहत असून सर्वच धरणे 100 टक्के भरलेले आहेत असे असताना कोपरगाव व राहाता तालुक्यात कालवा कृती समितीच्या बैठका घेऊनही शेतकर्यांना पाच सात पाण्याची आवर्तने मिळतील अशी अपेक्षा असताना तीन आवर्तनाचे आश्वासन पदरी पाडण्यात समाधान मानावे लागले. तर या दिग्गज नेत्यांना पन्नास वर्षे सत्ता मिळून व मंत्रीपदे मिळून देखील पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवावे याकरिता छगन भुजबळ यांना साकडे घालावे लागणे म्हणजे या राजकीय नेत्यांच्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब केला असून जनतेचे रस्ते, पाणी या मूलभूत समस्या सुटत नसतील तर नुसते भुजबळांना साकडे घालण्यापेक्षा तालुक्याचे नेतृत्व भुजबळांसारख्या खमक्या नेत्याच्या हातात द्यावे अशी जनतेत चर्चा सुरू आहे. यापुढे जनता यांच्या भूलथापा सहन करणार नाही, असा निर्धारही व्यक्त केला आहे.