संगमनेर पालिकेने कोविड सेंटर सुरू करावे; भाजपची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होत असून, रोज बाधितांचा आकड विक्रम रचत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे पालिकेने कोविड सेंटर सुरू करावे. तसेच प्राणवायू, व्हेंटिलेटर व प्रशिक्षित डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी मागणी संगमनेर भाजप युवा मोर्चाच्यावतीने मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्याकडे सोमवारी (ता.19) निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत पालिकेने 50 खाटांचे कोविड सेंटर सुरू केलेले आहे. तेथे कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील गरजूंना त्याचा लाभ घेता येत नाहीये. विशेष म्हणजे 50 खाटांची क्षमता असताना केवळ सौम्य लक्षणे असलेली 14 रुग्ण उपचार घेत आहेत. यासाठी पालिकेने कमीत कमी खर्चात गोरगरीबांना उपचार मिळण्यासाठी प्राणवायू, व्हेंटिलेटर व रेमडेसिवीरची उपलब्धता करुन देऊन पूर्ण क्षमतेने कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीस मुख्याधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 24 प्राणवायूच्या खाटा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. सदर निवेदन देतेवेळी भाजप युवामोर्चाचे शहराध्यक्ष दीपेश ताटकर, शशांक वामन, प्रकाश दिघे, वरद बागुल, अक्षय अमृतवाड, योगेश घुगे, सागर भोईर, धीरज ढगे, विनायक तांबे आदी उपस्थित होते.