आमचे राजकारण आम्ही पाहू; तुम्ही संकटकाळात राजकारण करू नका! आमदार राधाकृष्ण विखेंनी संगमनेर तालुका आरोग्य अधिकार्‍यांना सुनावले खडेबोल


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोणाच्या सांगण्यावरून शिर्डी मतदारसंघात अधिकारी निर्णय करणार असतील, तर ते खपवून घेणार नाही. आमचे राजकारण आम्ही पाहून घेवू, तुम्ही या संकटकाळात राजकारण करू नका, अशा शब्दांत भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप यांना खडेबोल सुनावले आहेत.

कोरोना संदर्भात तालुक्यातील महसूल व आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत आश्वी खुर्द येथे झालेल्या बैठकीत कोविड लसीवरुन झालेल्या राजकारणामुळे ते चांगलेच संतप्त झाले. यावेळी बोलताना आमदार विखे-पाटील म्हणाले, सध्याचे वातावरण गंभीर आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही. परंतु अशा परिस्थितीत तुम्ही मनमानी करणार असाल, तर तुमच्या विरोधात मुख्य सचिवांकडे तक्रार करावीच लागेल, तुम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही, या शब्दांत त्यांनी तालुका आरोग्याधिकार्‍यांचा समाचार घेतला.

संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आलेला कोविड प्रतिबंधक लसीचा डोस डॉ.सुरेश घोलप यांनी दबावातून जोर्वे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात पाठविल्याने असंख्य सामान्य नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले होते. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तालुक्यातील निमगाव जाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण मोहीम सुरू होती. मात्र या आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवारी या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणार्‍या गावांमधील नागरिकांना लस न मिळाल्याने घरी परतावे लागले होते. याची विखे-पाटील यांनी चौकशी करुन, प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

निमगाव जाळी येथील लसींचे डोस डॉ.घोलप यांनी कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावामुळे जोर्वे येथील उपकेंद्रात पाठवले. याबाबत तहसीलदार अमोल निकम यांना कोणतीच कल्पना नसल्याचे समजते. तसेच लॉकडाऊन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी पोलीस प्रशासन आणि गटविकास अधिकार्‍यांनाही धारेवर धरले. तहसीलदारांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितले. या घटनेबाबत डॉ.सुरेश घोलप यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकार्‍यांकडे झाल्याने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घोलप वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. या बैठकीस 26 गावांमधील प्रमुख कार्यकर्ते, खासगी डॉक्टर, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड.रोहिणी निघुते, रामभाऊ भुसाळ, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

निमगाव जाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लस तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी परस्पर दुसरीकडे पाठवल्याने अनेक ज्येष्ठ नागरीकांना लसीकरणापासून वंचित रहावे लागले. या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 18 गावांमधून नागरिक सकाळपासून लसीकरणासाठी येतात याचा विचार आरोग्य विभागाने करणे गरजेचे होते.
– अमोल जोंधळे (सरपंच, निमगाव जाळी)

जोर्वे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनाही कळवले नाही. आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी गलिच्छ राजकारण करून ठराविक कुटुंबियांना लस दिली. यामुळे जोर्वे आणि पंचक्रोशीत सामान्य नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले.
– गोकुळ दिघे (उपसरपंच, जोर्वे)

Visits: 15 Today: 1 Total: 116384

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *