शेवगाव तालुक्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा शेती पिकांचे मोठे नुकसान तर रस्तेही उखडले

नायक वृत्तसेवा, शेवगाव
तालुक्यातील बोधेगाव परिसरात रविवारी (ता.26) पहाटे एकच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. पूर्व भागातील गावांत लागोपाठ तिसर्यांदा अतिवृष्टी झाल्याने शेतांना तलावांचे स्वरूप आले. शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेवगाव-गेवराई मार्गावरील काळ्या ओढ्यावरील पूल पुरामूळे उखडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
![]()
बोधेगावसह बालमटाकळी, लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे, आधोडी, आंतरवाली, दिवटे, हातगाव, कांबी, मुंगी व इतर गावांत यापूर्वी 30 ऑगस्ट, 4 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या नाकीनऊ आलेले आहेत. त्यात तिसर्यांदा पुन्हा रविवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. या पावसाची बोधेगाव व चापडगाव मंडलात 76 व 67 मिलिमीटर अशी नोंद झाली. एकाच महिन्यात तीनदा अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने कपाशी, तूर, सोयाबीन, बाजरी, कांदा, ऊस आदी खरिप पिकांचे मातेरे झाले. अजूनही मंडलातील अनेक शेतकर्यांच्या नुकसानींचे पंचनामे झालेले नाहीत.

दरम्यान, मागील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत. मात्र अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यातच पुन्हा एकदा या परिसराला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे या दोन्ही नुकसानीची भरपाई घोषणा न करता तातडीने शेतकर्यांच्या हातात देण्याची मागणी होत आहे.
