चिलेखनवाडीतील ऑक्सिजन प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवा ः गडाख

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील चिलेखनवाडी येथील ऑक्सिजन प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवा, तेथे स्वतंत्र वीज कर्मचार्‍याची नेमणूक करा, तसेच ऑक्सिजन भरण्यासाठी लागणारे रिकामे गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री मंत्री शंकरराव गडाख यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

मंत्री गडाख यांनी गुरुवारी (ता.22) सकाळी 11 वाजता चिलेखनवडी येथील मे. लोचनाबाई इंडस्ट्रीज प्रा. लि. या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची पाहणी करून उत्पादन, मागणी व पुरवठा, उत्पादनात येणार्‍या अडचणी यांची माहिती घेतली. ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक बजरंग पुरी यांनी ऑक्सिजन उत्पादनात येणार्‍या अडचणी, वीज पुरवठा याची माहिती दिली. हा ऑक्सिजन प्रकल्प प्रतिदिन 3 मेट्रिक टन क्षमतेचा असून दिवसभरात अडीच ते पावणे तीन मे. टन क्षमतेने चालतो. सद्यस्थितीत दिवसाला 400 ते 450 ऑक्सिजन सिलिंडर भरले जातात. वीज पुरवठा एक मिनिटे खंडित झाला तर सिस्टीममधील ऑक्सिजन हवेत सोडून द्यावा लागतो. अन्यथा त्याचा बर्फ तयार होण्याची शक्यता असते. अशी वेळ आली तर किमान 28 सिलिंडरचे नुकसान होते. हा ऑक्सिजन प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवायचा झाल्यास 24 तास अखंडित वीज पुरवठा व रिकाम्या सिलिंडरची उपलब्धता आवश्यक आहे. त्यावर मंत्री गडाख यांनी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, गणेश पवार व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना सूचना देऊन रिकाम्या सिलिंडरची व्यवस्था करणे, तसेच 24 तास वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. 24 तास अखंडित वीज पुरवठा कसा राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

Visits: 8 Today: 3 Total: 29479

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *