प्रेमसंबंधातून तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी तरुणास अटक अश्लील चित्रफीत व छायाचित्रे सार्वजनिक ठिकाणी पसरवली

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील गारवाडी येथील आदिवासी समाजातील 27 वर्षीय तरुणीच्या अश्लील चित्रफीत परिचयाच्या भ्रमणध्वनीवर व छायाचित्रे रस्त्यावर व मंदिर परिसरात टाकून प्रेमसंबंधातून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन कुंभेफळ येथील तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, कुंभेफळ येथील आरोपी चंद्रशेखर आनंदा कोटकर (वय 28) हा पीडित तरुणीबरोबर मालदाड येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. एकाच तालुक्यातील असल्याने त्यांची सुरुवातीला चांगली ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊन प्रेमसंबंध जुळले.

दरम्यान, कोटकर हा कृषीचे शिक्षण घेतल्यानंतर नारायणगाव येथील एका खासगी कंपनीत नोकरीस लागला. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यात काही कारणांवरुन बिनसले. याचा राग आल्याने त्याने पीडित तरुणीच्या अश्लील चित्रफीत पीडितेच्या परिचयाच्या भ्रमणध्वनीवर व छायाचित्रे गारवाडी येथील रस्त्यावर व मंदिर परिसरात टाकून बदनामी केली. सदर गंभीर प्रकार ग्रामस्थांनी पीडितेच्या शासकीय खात्यात अभियंता पदावर असलेल्या वडीलांस सांगितला. त्यानंतर पीडितेला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली. यावरुन पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर कोटकर याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम 354 (क) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 76 व अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करून गजाआड केले आहे. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, तीव्र संताप व्यक्त होत आहे.


प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींची फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर येतात. त्यामुळे तरुणींनी सावध राहून तरुणांच्या भुलभुलैय्याला बळी पडू नये. याबाबत पालकांनीही जागरुक राहून पाल्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 115490

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *