अखेर संगमनेरकरांना मिळाला दहा मेट्रीक टन ऑक्सिजन! शुक्रवारच्या प्रसंगातून घडले स्थानिक यंत्रणेतील उत्कृष्ट समन्वयाचे दर्शन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शुक्रवारी संगमनेरातील खासगी रुग्णालयांचा ऑक्सिजनसाठा संपण्याची स्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात एकप्रकारे अघोषीत आणीबाणीचा बाका प्रसंग उभा राहीला होता. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून अखेर सायंकाळी चाकण औद्योगिक वसाहतीतून पाच मेट्रीक टन आणि आज सकाळी पुन्हा पाच मेट्रीकटन साठा उपलब्ध झाल्याने तालुक्यातील विविध ठिकाणच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्ये दाखल असलेल्या साडेतीनशे रुग्णांचा जीव भांड्यात पडला आहे. विशेष म्हणजे सदरचे ऑक्सिजन टँकर अन्य कोणी परस्पर पळवून नेवू नये यासाठी नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकार्‍यांसह पोलीस बंदोबस्तात त्यांना चाकणपासून संगमनेरपर्यंत आणण्यात आले.

देशासह संपूर्ण राज्यात सध्या ऑक्सिजनची मोठी टंचाई सुरु आहे, अशास्थितीत उपलब्ध असलेला ऑक्सिजन आपल्या भागातील रुग्णालयांना मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची धावपळ सुरु असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. शुक्रवारी (ता.22) संगमनेरातील बहुतेक सर्वच खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपण्याची स्थिती निर्माण झाली होती. याबाबतची माहिती मिळताच प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या. याच दरम्यान ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास काय? यावरील उपयायोजना भाग दोनही कार्यान्वित करण्यात आली होती.

संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी संगमनेरात उद्भवलेल्या या प्रसंगाची माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिली. त्यानंतर त्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून चाकण औद्योगिक वसाहतीमधील पुरवठादार कंपनीशी स्वतः संपर्क करुन त्यांना ऑक्सिजनची तातडी कळवली. मात्र त्याचवेळी संबंधित कंपनीने एकाच टँकरद्वारा दोन ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे सांगत आधी ऑक्सिजनची खेप राहाता तालुक्यात द्यावी लागेल असे सांगितले. मात्र त्यात बराच वेळ गेला असता व त्यामुळे संगमनेरात मात्र ऑक्सिजन संपून दाखल असलेल्या साडेतीनशे रुग्णांचे जीव संकटात सापडले असते.

या सर्व गोष्टींची माहिती असल्याने मंत्री थोरात यांनी संबंधित पुरवठादार कंपनीच्या वरीष्ठांशी सातत्याने संपर्क ठेवून सदरचा टँकर संगमनेर मार्गानेच राहात्याकडे जाणार असल्याने आधी संगमनेरला ऑक्सिजन देण्याची विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने कोणताही अनर्थ घडण्यापूर्वीच नायब तहसीलदार सुभाष कदम हे पोलीस बंदोबस्तात पाच मेट्रीक टन ऑक्सिजन घेवून संगमनेरात दाखल झाले आणि ऑक्सिजनच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. आज सकाळीही नायब तहसीलदार भाऊसाहेब कडनोर हे आणखी पाच मेट्रीक टन ऑक्सिजन घेवून संगमनेरात पोहोचले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस संगमनेरकरातील रुग्णालयांना पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी संगमनेरात मोठा बाका प्रसंग उभा राहिला होता. तालुक्यातील जवळपास सर्वच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समधील ऑक्सिजनची पातळी खालावल्याने काहीतास पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याची वार्ता समोर आली. या वृत्ताने प्रशासनाची एकच धावपळ उडाली, फोनाफोनी, संपर्क, विनंत्या, आर्जवे अशा अनेक प्रकारातून अखेर सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी कोठलीही अप्रिय घटना समोर येण्यापूर्वीच संगमनेरात आवश्यक ऑक्सिजन पोहोचले आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेतून लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि रुग्णालये यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचे दर्शन घडले.

Visits: 81 Today: 1 Total: 1114472

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *