धक्कादायक; ऑक्सिजन टँक लीक झाल्याने 11 जणांचा मृत्यू नाशिक महानगरपालिकेच्या जाकीर हुसेन रुग्णालयातील घटना

नाशिक, वृत्तसंस्था
राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असताना रुग्णालयात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात येत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाच नाशिकमधील महानगरपालिकेच्या जाकीर हुसेन या रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

नाशिक शहरातील प्रमुख समजल्या जाणार्‍या जाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टँकला गळती लागल्याने हजारो लिटर ऑक्सिजन वाया गेल्याची घटना आज दुपारी एक वाजता घडली. यावेळी 131 रुग्ण महापालिकेच्या जाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून इतर काही लोकांना हा दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे.

रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असून रुग्णालयात सध्या 131 रुग्ण आहेत. यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा रुग्णालयातून अतिरिक्त साठा मागवण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन टँकमधून होणारी गळती थांबवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.

झाकीर हुसेन हॉस्पिटल नाशिक शहरातील सगळ्यात मोठे हॉस्पिटल समजले जाते. याठिकाणी शहरातील नागरिकांसह, जिल्ह्यातील रुग्णांवरही मोठ्या प्रमाणात उपचार केले जातात. याठिकाणी सध्या 131 रुग्ण उपचार घेत होते. 170 बेडचं हे हॉस्पिटल असून त्यामध्ये 17 बेड हे व्हेंटिलेटर असे होते. सहा ते सात लोकांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. नुकतंच दहा सिलेंडर सिव्हिल हॉस्पिटलमधून या रुग्णालयात आणण्यात आले असून तातडीने त्याची जोडणी पूर्ण करण्यात आली आहे.

11 रुग्णांचा मृत्यू…
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिजन गळती झाल्यामुळे 11 रुग्ण दगावले आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या हवाल्यानं त्यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, अद्याप रुग्णालय प्रशासनानं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये.


30 ते 35 रुग्ण दगावण्याची भीती…

झाकीर हुसेन रुग्णालयाच्या व्हेंटिलेटर कक्षामध्ये किंवा ऑक्सिजन सुरु असलेल्या रुग्णांची संख्या साधारण 61 इतकी होती. यातील तीस ते पस्तीस दगावतील अशी भीती, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केली आहे. ज्या कंपनीचा ऑक्सिजन प्लांट आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Visits: 253 Today: 3 Total: 1420820

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *