दुष्काळातही निळवंड्यातून ‘पुन्हा’ आवर्तनाचा घाट! लागोपाठ प्रदीर्घकाळ प्रवरामाई वाहणार; पिण्याच्या पाण्याला जोडून रब्बीचेही नियोजन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर-अकोले शहर वगळता लाभक्षेत्रातील बहुतेक शहरांसह नदीपात्राच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागल्याने जलसंपदामंत्र्यांच्या आदेशाने रविवारी निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. कालवा सल्लागार समितीच्या नियोजनानुसार 1 डिसेंबररोजी रब्बीच्या पिकांसाठी सिंचनाचे आवर्तनही प्रस्तावित असल्याने अवघ्या महिन्याभरापूर्वी तब्बल 41 दिवस वाहीलेली प्रवरामाई पुन्हा प्रदीर्घकाळ प्रवाहीत राहण्याची शक्यता आहे. सध्या राज्यासह जिल्ह्यावर पाणी आणि जनावरांच्या चार्याचे तीव्र संकट घोंगावत आहे, दुष्काळाच्या पहिल्याच टप्प्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश असतानाही अवघ्या महिनाभराच्या अंतराने प्रदीर्घ प्रस्तावित आवर्तनाने आश्चर्यही निर्माण झाले आहे. जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट पुढीलवर्षी वेळेवर पाऊस पडण्याच्या आशेवर अवलंबून आहे, त्याबाबत कोणतीही निश्चिती नसताना उपलब्ध पाणीसाठ्यांचा अविवेकी वापर संकटांना आमंत्रण ठरु शकतो. आजच्या स्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असताना सलगच्या या प्रस्तावित प्रदीर्घ आर्वनातून धरणांमधील पाणीसाठा 20 टक्क्यांनी खालावून दोन्ही धरणांमधील एकूण पाणीसाठा वर्षाच्या अखेरीलाच 60 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अलनीनोच्या प्रभावाखाली आलेल्या महाराष्ट्रात यंदा पावसाने दगा दिल्यानंतर आता दुष्काळाचे संकट तोंड वासून उभे राहीले आहे. राज्यशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत
बहुतेक संपूर्ण राज्याचाच समावेश आहे. यंदाच्यावर्षी पश्चिमेकडील घाटमाथा वगळता अहिल्यानगर जिल्ह्यालाही या वातावरण बदलाचा मोठा फटका बसला, पाण्याअभावी पिके गेल्याने शेतकरी हवालदिल झाला. पाऊसच नसल्याने जनावरांच्या चार्याचाही प्रश्न निर्माण होवू लागला. समुद्रपातळीच्या तापमानात वाढ झाल्याने जमिनींमधील पाण्याचे स्रोतही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच तळाला जावू लागले आहेत. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांची स्थिती आजच कठीण आहे. राज्य सरकारने त्यावर उपाययोजनांच्या माध्यमातून राज्यातील सर्व धरणांचे आणि तलावांचे जलसाठे नियंत्रित केले आहेत.

दुष्काळाची पहिली कळ सोसणार्या जिल्ह्यांच्या पहिल्याच यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांचा समावेश आहे. यंदा जाणवलेला वातावरणीय फटका पुढीलवर्षीच्या संभाव्य पावसापर्यंत सोसावा लागणार आहे. जागतिक तापमानवाढ, समुद्रात वारंवार निर्माण होणारी वादळं आणि त्याचा ऋतुचक्रावर होत असलेला परिणाम पाहता पुढील वर्षीही वेळेवर अथवा अपूर्ण पाऊस झाला तर? या नकारात्मक शक्यतेचा अधिक गांभीर्याने विचार करुन उपलब्ध पाणीसाठ्यांचे नियोजन आणि नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. अन्नधान्याचा दुष्काळ निर्माण झाल्यास ते कोठूनही उपलब्ध करता येणं शक्य आहे, मात्र पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्यास मूळ स्थानापासून परागंदा होण्याशिवाय पर्याय नसतो यावर आजच्या स्थितीत चिंतन होण्याची गरज आहे.

संगमनेर व अकोले शहर वगळता लाभक्षेत्रातील उर्वरीत शहरे व नदीपात्रालगतच्या बहुतेक गावांच्या पाणीपुरवठा योजना आवर्तनाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानंतर प्रचलित स्रोतांद्वारा त्यांना पाणी पोहोचवण्यासाठी चार ते पाच दिवसांचे आवर्तन घेतले जाते, ज्यात 400 ते 500 दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होतो. गणपतीच्या दरम्यान सोडण्यात आलेल्या आणि तब्बल 41 दिवस सुरु असलेल्या पहिल्याच
आवर्तनात निळवंडे धरणाचा 35 टक्के तर, भंडारदर्याचा 9 टक्के पाणीसाठा वापरण्यात आला. मात्र त्या उपरांतही या दोन्ही धरणांत मिळून समाधानकारक 80 टक्के पाणीसाठा शिल्लक असताना अवघ्या महिनाभरात पुन्हा प्रदीर्घ आवर्तनाचा घाट, पहिल्या आवर्तनाबाबत संशय निर्माण करणारा आहे. रविवारी सोडण्यात आलेल्या पिण्याच्या आवर्तनात साधारणतः अर्धा टीएमसी पाणी खर्ची होवू शकते. नियमानुसार सदरचे आवर्तन 19 किंवा 20 नोव्हेंबररोजी बंद होणे अपेक्षित आहे.

मात्र त्यानंतर दहा दिवसांतच कालवा सल्लागार समितीने प्रस्तावित केलेले रब्बीचे प्रदीर्घ आवर्तनही सुरु होणार आहे. या दोन्ही आवर्तनादरम्यानच्या दहा दिवसांच्या कालावधीत नदीपात्र कोरडे होणार की पिण्याच्या नावाखाली रविवारी सुरु झालेले आवर्तन पंधरा दिवस सुरु ठेवून 1 डिसेंबरपासून त्यालाच लागून सिंचनाचे प्रदीर्घ आवर्तन जोडण्याचा आणि पुन्हा साडेतीन ते चार टीएमसी पाण्याचा वापर करण्याचा घाट घातला जात आहे यावरुन लाभक्षेत्रात साशंकताही निर्माण झाली आहे. अनिश्चित ऋतुमानाचा पहिलाच फटका सोसणार्या जिल्ह्याला येणार्या काही महिन्यांत पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्यासाठी झुंजावे लागणार आहे. दक्षिणेकडील स्थिती याहूनही खूप बिकट आहे. अशा संभाव्य स्थितीत धरणांमध्ये पाणी उपलब्ध आहे म्हणून त्याचा अविवेकी वापर करण्याचा विचार संकटाला आमंत्रण देणारा ठरु शकतो.

भंडारदरा-निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात आवर्तनाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यांसाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आदेशान्वये रविवारी (ता.15) पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. या
आवर्तनातून पाणीपुरवठा योजनांचे स्रोत भरुन घेतले जाणार असून श्रीरामपूरचा साठवण तलाव भरल्यानंतर आवर्तन बंद होण्याची अपेक्षा आहे. मात्र त्यानंतर लागलीच 1 डिसेंबरपासून रब्बीच्या पिकांसाठी सिंचनाचे प्रदीर्घ आवर्तनही प्रस्तावित असल्याने दुष्काळाच्या सावटात पाण्याचा अविवेकी वापर तर होत नाही ना? अशी शंका सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण झाली आहे. जवळपास दीड महिना चाललेल्या पहिल्या आवर्तनात दोन्ही धरणांमधील 19 हजार 359 दशलक्ष घनफूट एकूण पाण्यातील 20 टक्के पाण्याचा वापर झाला होता. रविवारी दुपारी 4 वाजता आवर्तन सोडताना भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 10 हजार 28 दशलक्ष घनफूट (90.84 टक्के) व निळवंडे धरणाचा पाणीसाठा 5 हजार 464 दशलक्ष घनफूट (65.67 टक्के) इतका होता. चालू आवर्तनासह संभाव्य प्रदीर्घ आवर्तनातून पुन्हा 20 ते 25 टक्के पाणी खर्ची होण्याची शक्यता आहे. या दोन्ही आवर्तनांनंतर भंडारदरा व निळवंडे धरणांचा एकत्रित पाणीसाठी डिसेंबरमध्येच 55 ते 60 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

आगामी कालावधीत दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होण्याची आणि त्यातून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्याची स्थिती अधिक गंभीर होण्याची भीती असतांना महिन्याभरात पुन्हा प्रवाहीत झालेल्या अमृतवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहणार आहे. मात्र त्या उपरांतही निळवंडे धरणाच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेल्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची चुप्पी अनेकांना खटकणारी आहे. जिल्हा बँकेत झालेल्या सहमतीच्या राजकारणाने माजीमंत्र्यांना पाण्याच्या संघर्षापासून दूर नेल्याचीही चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीरामपूर शहरात आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत आहे, मग मागील आवर्तनाचे पाणी नेमके गेले कोठे असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

