अहमदनगर पाठोपाठ आता संगमनेरातही ऑक्सिजनची टंचाई! आज सायंकाळपर्यंत पुरेल इतकाच साठा; दुपारपर्यंत चार मेट्रिक टन साठा मिळणार : प्रांताधिकारी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर शहरामध्ये ऑक्सिजन टंचाईचा बाकाप्रसंग दूर होतो तोच आता संगमनेरातही ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. संगमनेरातील खासगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्ये पुढील काही तांस पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असून या रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या जवळपास साडेतिनशे रुग्णांचा जीव त्यामुळे टांगणीला लागला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतून आज सायंकाळपर्यंत चार मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार असल्याने चिंता करण्यासारखी स्थिती नसल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी दैनिक नायकशी बोलतांना दिली. संगमनेरातील रुग्णालयांना लागणार्‍या ऑक्सिजनसाठी महसुलमंत्री बाळासाहेब थोरातही प्रयत्नशील असून उद्यापर्यंत 10 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.


जिल्ह्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. बुधवारी तर उपचार घेणार्‍या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 21 हजारांहून अधिक होती. त्यामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या व ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्याही वाढल्याने जिल्ह्यात सर्वत्र ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दररोज 60 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. मंगळवारी रात्री अहमदनगर शहरातील रुग्णालयांमध्ये काही तासांचाच ऑक्सिजन शिल्लक राहील्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती. यावेळी अहमदनगर औद्योगिक वसाहतीतील काही उद्योजकांनी मदतीचा हात देत नगरकरांना तात्पुरता दिलासा दिला. त्याच दरम्यान पुण्याहून ऑक्सिजन घेवून निघालेल्या 19 मेट्रिक टनचे दोन टँकर पुणे पोलिसांनी अडविल्याने अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली होती.


मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी आणि पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन सदरचे टँकर जिल्ह्यात आणले आणि नगर शहरातील रुग्णालयांत दाखल रुग्णांची श्‍वासकोंडी रोखली. या प्रकरणातून जिल्ह्यात निर्माण झालेली धाकधूक थांबते न थांबते तोच आता संगमनेरात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली असून पुढील काहीतास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा सध्या शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हालचाली वाढल्या असून ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चिंताही वाढल्या आहेत. यासर्व परिस्थितीवर राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून संगमनेरातील रुग्णालयांना लवकरात लवकर ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.


संगमनेर तालुक्यातील विविध खासगी कोविड रुग्णालयांमध्ये आजच्या स्थितीत़ दाखल असलेल्या व ऑक्सिजनची नितांत गरज असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 344 इतकी आहे. त्यांना ऑक्सिजनचा अविरत पुरवठा होणं आवश्यक आहे. संगमनेर तालुक्याला दररोज सात मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत टंचाईमुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्याने संगमनेर तालुक्यात आज सायंकाळपर्यंत पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. वेळेत ऑक्सिजनचा टँकर न पोहोचल्यास तालुक्यात अभूतपूर्व स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.


याबाबत संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज दुपारपर्यंत चाकण येथील औद्योगिक वसाहतीतून चार मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्याचे सांगतांना शुक्रवारपर्यंत आणखी 10 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळेल असे दैनिक नायकशी बोलतांना सांगतले. अजूनतरी तालुक्यात आणीबाणी सारखी स्थिती नसून पुण्याहून निघालेला टँकर वेळेत पोहोचेल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


संगमनेर तालुक्यातील विविध ठिकाणच्या खासगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्ये दाखल असलेल्या रुग्णांपैकी 344 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यातील 47 रुग्ण ऑक्सिजनवर, 240 रुग्ण अतिदक्षता विभागात तर 57 रुग्ण बायपॅप अथवा व्हेंटीलेटरवर आहेत. यासर्वांसाठी दररोज सात मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. मात्र सध्या पुरवठ्यात व्यत्यय असल्याने आज सायंकाळपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा संगमनेरात आहे. चिंता करण्यासारखे कारण नसून सायंकाळपर्यंत हि टंचाई दूर होईल असा अधिकार्‍यांना विश्‍वास आहे.

Visits: 117 Today: 1 Total: 1412254

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *