जे क्षेत्र निवडाल त्यात सर्वोच्च ध्येय गाठा ः नागणे शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांसह मार्गदर्शकांचा सन्मान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शाळा हे संस्कारांचे केंद्र आहे. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो असून इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये येण्याची मलाही संधी मिळाली होती. प्रत्येकाचे ध्येय व क्षेत्र वेगवेगळे असले तरी कोणतेही क्षेत्र कमी नसून जे क्षेत्र निवडाल त्यामध्ये सर्वोच्च ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा, असे उद्गार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी काढले.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. तालुक्यातील एकूण 14 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली. चौधरवाडी, कणसेवाडी, जोंधळवाडी या शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला. याप्रसंगी त्यांनी सांगितलेल्या तीन मित्रांचा जीवनप्रवास या वास्तवातील गोष्टीने सर्वांच्या मनाचा वेध घेतला. समोर ध्येय ठेवून कठीण परिश्रम केल्यास यशाला गवसणी घालता येते, असे ते म्हणाले. सभापती सुनंदा जोर्वेकर यांनी आपल्या मनोगतात जिल्हा परिषद शाळा या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा खर्या अर्थाने विकास करत असतात असे गौरवोद्गार काढले. व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी मनोगतामध्ये जिल्हा परिषद शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

गटशिक्षणाधिकारी के. के. पवार, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सुवर्णा फटांगरे यांचाही शिष्यवृत्ती मार्गदर्शन व योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. उपसभापती नवनाथ अरगडे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, संगीता कुदनर, विष्णूपंत रहाटळ, बेबी थोरात, संतोष शेळके, काशिनाथ गोंदे, सुनीता कानवडे, आशा इल्हे, प्रियंका गडगे, विस्ताराधिकारी बाळकृष्ण खोसे, मुख्याध्यापक अंबादास झावरे, शिक्षक बँकेचे संचालक किसन खेमनर, शिवाजी आव्हाड आदी उपस्थित होते. निळवंडे शाळेतील वैष्णवी टपाल व तन्वी वाकचौरे या विद्यार्थिनींनी तर शिक्षक प्रतिनिधी सुदाम दाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शिष्यवृत्ती तज्ज्ञ अनिल कडलग यांनी तर आभार प्रदर्शन गौतम मिसाळ यांनी केले.
