संगमनेर शहरात एकाच रात्री पाच घरफोड्या! गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक संपला; साडेआठ लाखांच्या दागिन्यांसह साडेचार लाखांची रोकड गायब..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राजकीय पुढार्‍यांची चापलुसी आणि अवैध वसुलीतच मश्गुल असलेल्या संगमनेर शहर पोलिसांच्या निष्क्रियतेचा फायदा घेत दुष्काळाच्या नावाखाली उत्पात माजवणार्‍या चोरट्यांनी उपनगरांपाठोपाठ आता आपला मोर्चा शहरातील गजबजलेल्या वसाहतींकडे वळवला आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी शहराच्या विविध ठिकाणी मनसोक्त धिंगाणा घालीत पाच घरफोड्या करीत 8 लाख 50 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह 4 लाख 45 हजार रुपयांची रोकड असा एकूण 12 लाख 95 हजारांचा मुद्देमाल गायब केला आहे. काही ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांच्या छबीही टीपल्या गेल्या आहेत, मात्र गेल्या काही वर्षांपासून निष्क्रियतेच्या काळोखात जगणार्‍या शहर पोलिसांकडून त्याचा छडा लागण्याची शक्यता दुर्मीळ असल्याने एकाच रात्री घडलेल्या या पाच घरफोड्यांनी संगमनेरकरांमध्ये दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी आपली राहिलेली लक्तरं झाकण्यासाठी पाचही ठिकाणच्या घटना एकाच फिर्यादीत समाविष्ट करण्याचा केविलवाणा प्रकार केल्याचेही समोर आले आहे.


याबाबत शहर पोलिसांनी पाच ठिकाणी घडलेल्या घटनांमधील अभिनवनगर या अतिशय गजबजलेल्या परिसरातील उच्चभू वसाहतीत राहणार्‍या स्वप्निल शरद तवरेज यांची एकमेव फिर्याद दाखल करुन घेतली आहे. त्यानुसार श्रीराम मंदिराशेजारीच राहणारे तवरेज गेल्या बुधवारी (ता.11) आपल्या कुटुंबियांसह लग्नकार्यायाठी बाहेरगावी गेले होते. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या घरासमोरच राहणार्‍या त्यांच्या चुलत भगिनी बाहेरगावी जाण्यासाठी घराबाहेर पडल्या असता त्यांना आपल्या भावाच्या घरातील लाईट सुरु असल्याचे दिसले. त्यामुळे संशय बळावल्याने त्यांनी अधिक जवळ जावून पाहीले असता घराचे कुलुप तोडल्याचे व आतील सामानाची उचकापाचक झाल्याचे चित्रही त्यांच्या समोर आले. त्यावरुन घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वप्निल यांना फोन करुन घटना कळवली.


बाहेरगावी असलेल्या तवरेज यांनी गावी जाताना मौल्यवान ऐवज घरातच ठेवल्याने त्यांनी तातडीने संगमनेर गाठले. यावेळी त्यांच्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी शयनकक्षातील कपाटातून सोन्याचे दागिने, बिस्किट आणि रोकड लंपास झाल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी आपल्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमधील चित्रण तपासले असता पहाटे चारच्या सुमारास तिघा चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडून त्यांच्या घरात प्रवेश करुन जणू त्यांना तवरेज यांच्या अनुपस्थितीची पूर्ण कल्पना असल्याप्रमाणे मनसोक्त उचकापाचक करुन घरातील संपूर्ण ऐवज गायब केल्याचे दिसून आले.


या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठले असता तशाच प्रकारच्या तक्रारी घेवून अन्य पाचजण त्यांच्याआधीच तक्रारीसाठी ताटकळत असल्याचे भयानक दृष्यही त्यांना बघायला मिळाले. चोरीच्या पाचही घटनांमध्ये स्वप्निल तवरेज यांच्या घरात झालेली चोरी मोठी असल्याने शहर पोलिसांनी आपली फाटलेली लक्तरं वाचवण्यासाठी त्यांच्या एकाच तक्रारीत रहेमतनगरमध्ये राहणार्‍या सज्जाद जावेद शेख यांच्या घरातून चोरीला गेलेल्या साडेनऊ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांसह 3 लाख 95 हजार रुपये चोरीची घटना, डाकेमळा, नाईकवाडपूरा परिसरात राहणार्‍या अकिल उस्मान शेख यांची घरफोडी, शिवाजीनगरमधील हॉटेल अंबरसमोरील पुष्पा भाऊसाहेब पावसेे व मूळ फिर्यादी तवरेज यांच्या घराजवळच राहणार्‍या सचिन विठ्ठल गायकवाड यांच्या घरात झालेल्या पाचही घटना एकत्र करुन अज्ञात तिघा चोरट्यांविरोधात 12 लाख 95 हजारांचा ऐवज चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार पूर्ण केले आहेत.


दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होण्याचा पूर्वानुमान असतानाही त्यावर आवश्यक उपाय योजना करण्याचे सोडून दिवसभर राजकारण्यांची चापलुसी आणि अवैध व्यावसायिकांकडून वसुली करण्यातच मश्गुल असलेल्या संगमनेर पोलिसांच्या निष्क्रियतेचा फटका आता उपनगरीय रहिवाशांसह शहराच्या गजबजलेल्या वसाहतींमध्ये राहणार्‍यांनाही बसत असून गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक जवळजवळ संपल्यात जमा असल्याचे दुर्दैवी चित्र संगमनेरात दिसू लागले आहे. न लागणार्‍या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.


पूर्वी थंडीच्या हंगामात व दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर चोरीसह गुन्हेगारी घटनांच्या वाढीचा विचार करुन तत्कालीन अधिकारी नाकाबंदी, गस्तीत वाढ, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध, प्रलंबित प्रकरणांचे तपास याद्वारे त्यावर नियंत्रण मिळवत असत. मात्र गेल्याकाही वर्षात संगमनेर पोलीस ठाण्यात सुरु झालेली निष्क्रिय अधिकार्‍यांची श्रृंखला खंडीतच होत नसल्याने आणि त्यात त्यांच्या निष्क्रियतेलाही ‘राजाश्रय’ प्राप्त असल्याने सर्वसामान्य जनतेला कोणीही वाली नसल्यागत अवस्था असून नागरिकांनी आपल्या साधनसंपत्तीची सुरक्षा स्वतःच करावी अशी अभूतपूर्व स्थिती संगमनेरात निर्माण झाली आहे.

Visits: 6 Today: 6 Total: 2348363

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *