‘कुटुंब फाऊंडेशन’ने दिला कोविड मृतांच्या कुटुंबाला आधार! अवघ्या पंधरा दिवसांत बावीस कोविड बाधितांवर विधीवत अंत्यसंस्कार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या प्रियजनांना अखेरचा निरोप देण्यासाठी शेकडों लोकांच्या उपस्थितीतल्या अंत्ययात्रा आजवर अनेकांनी बघितल्या असतील. मात्र कोविडने ही परिस्थिती बदलली आहे. आज कोविडचा बळी ठरलेल्या मृतांच्या अंत्ययात्रेचे तर दूरच पण मृतकाच्या जवळचे आणि रक्तातील नातेवाईकही वैकुंठधाममध्ये येण्यास धजावत नाहीत. अशा स्थितीत मृतात्म्याचे विधीवत अंतिम संस्कार कसे पार पाडावे असा यक्षप्रश्न अनेकांसमोर उभा असतो. मात्र संगमनेरच्या कुटुंब फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने कोविडचा बळी ठरलेल्या मृताच्या नातेवाईकांना केवळ दिलासाच नव्हेतर आपुलकीचा आधार देण्याचा संकल्प केला आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने गेल्या पंधरा दिवसांत 22 कोविड बाधितांवर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंसकार केले आहेत. तरुणांच्या या समूहाने सुरु केलेली ही सेवा मानवतेची सर्वोच्च सेवा असून मृतकाच्या परिवारालाही त्यातून मोठा आधार मिळाला आहे.

आयुष्यभर जात, धर्म, पंथ, आपला आणि परका अशा गर्तेत राहणारा माणूस जेव्हा कोविड संक्रमणातून मृत्यूमुखी पडतो तेव्हा शांत झालेल्या त्याच्या पार्थिवाला स्पर्श करण्यासही कोणी धजावत नाहीत. अशा स्थितीत मनोमन इच्छा असूनही मृतकाच्या नातेवाईकांमध्ये आणि स्नेहीजणांमध्ये कोविडची भिती असल्याने अनेकजण यंत्रणेमार्फत ज्या पद्धतीने होती त्यानुसार अंत्यसंस्काराचा पर्याय निवडला जातो. मात्र त्यातून त्यांना समाधान लाभत नसल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे. एकतर आपल्या प्रियजनांच्या अकस्मात मृत्यूने शोकाकूल झालेले आप्तस्नेही आणि त्यातच कोविडची दहशत या चक्रात अडकलेल्या मृताच्या नातेवाईकांना दिलासा देणार्‍याही असंख्य घटना देशाच्या कानाकोपर्‍यातून समोर येत आहेत.

गेल्या वर्षी संगमनेरात कोविडचे संक्रमण सुरु झाल्यानंतर संगमनेर तालुक्यातील अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, उद्योग व आस्थापनांनी पुढाकार घेत गरजूंना आपापल्या परिने सहकार्य केले होते. त्यावेळी संगमनेरातील काही ध्येयवादी तरुणांनी एकत्रित येवून स्थापलेल्या कुटुंब फाऊंडेशन या संघटनेने आपली सामाजिक जबाबदारी सांभाळतांना गरजूंना अन्नदान, औषधांचा पुरवठा व निराधारांना आवश्यक वस्तुंचा पुरवठा करुन आपल्यातील सामाजिक कणव स्पष्ट केली होती. या कालावधीत सुसंपन्न असूनही टाळेबंदीमुळे औषधे अथवा अन्य जीवनावश्यक वस्तू आणू न शकणार्‍यांनाही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली होती. त्यांच्या या कामाची दखल घेवून शहरातील काही संस्थांनी ‘कोविड योद्धा’ म्हणून संघटनेच्या सदस्यांचा सन्मानही केला.

सध्या जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात कोविडचा प्रचंड उद्रेक झाला आहे. सध्याचे संक्रमण अधिक जीवघेणे आणि घातक असल्याने संसर्ग झालेल्या व्यक्तिंचा मृत्यू होण्याचे प्रमाणही गेल्यावेळी पेक्षा अधिक आहे. त्यामुळे कोविडने सर्वसामान्य माणसांच्या मनात एकप्रकारे आपली दहशतच निर्माण केली आहे. त्यामुळे साहजिकच संक्रमण होवून मृत्यूमुखी पडलेली व्यक्ति आपल्या कुटुंबातील अथवा जवळची असली तरीही अनेकांना इच्छा असूनही केवळ आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या अंत्यसंस्कारापासून दूर रहावे लागते. त्यामुळे आपल्या प्रियजनांचा अंत्यविधी मनासारखा शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याची खंतही त्यांच्या मनात कायम रहाते.

संगमनेरकरांची ही अवस्था लक्षात घेवून संगमनेरच्या कुटुंब फाऊंडेशन या संघटनेने स्थानिक प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने कोविडचा बळी ठरलेल्या मृतकांच्या विधीवत अंत्यसंस्काराची जबाबदारी स्विकारली आहे. गेल्या अवघ्या पंधरा दिवसांतच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 22 मृतांना भडाग्नी देत त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रार्थना केली आहे. संघटनेचे कार्यकर्ते केवळ संगमनेर शहरच नव्हेतर ग्रामीणभागात बोलावणे आल्यास तेथेही जावून अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारतात. त्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया यांच्याकडून त्यांना पीपीई किट दिल्या जात आहेत, तर अन्य काही दानशूर व्यक्तिंकडून मृतकाच्या पार्थिवासाठीची बॅग व अन्य साहित्य पुरविले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कुटुंब फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून समर्पित भावनेने सुरु असलेल्या मानवसेवेच्या हा महान कार्याचे अनेकांनी कौतुक केले असून यासाठी आवश्यक असलेली सामग्री देण्यासाठीही अनेकजण पुढे येत आहेत.


तरुणांचा एखादा समूह निर्माण झाला की त्यातून विधायक कार्यही घडू शकते आणि विध्वंसकही. कुटुंब फाऊंडेशनने सुरु केलेले अंत्यसंस्काराचे कार्य संपूर्ण मानवजातीत उच्च दर्जाचे असून त्याद्वारे केवळ मृतात्म्याला शांतीच नव्हेतर त्याच्या कुटुंबियांनाही हा आघात सहन करण्यासाठी मोठा आधार ठरत आहे. याशिवाय संघटनेकडून तातडीच्या रुग्णासाठी रुग्णवाहिकेचेही सेवा देण्यात येते, तसेच ज्या व्यक्ति वयस्कर आहेत अथवा स्वतः बाहेर येवून आवश्यक गोष्टी घेवू शकत नाहीत त्यांनाही आधार देण्याचे काम कुटुंब फाऊंडेशनद्वारा सुरु आहे. त्यांच्या या कार्याचे शहरातून अनेकांनी कौतुक केले असून मदतीचा हातही पुढे केला आहे.

Visits: 72 Today: 1 Total: 1102039

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *