कोरोनाच्या संकटातही भाजपकडून राजकारण ः थोरात राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांवर जोरदार टीकास्त्र

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्याप्रकरणी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला काल विलेपार्ले पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप नोंदवला. फडणवीस आणि दरेकर यांच्या या भूमिकेवर सत्ताधार्‍यांकडून जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील फडणवीस आणि दरेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

देशावर आणि राज्यावर कोरोनाचे संकट आले असून अशा परिस्थितीत राजकारण केले जाऊ नये, मात्र दुर्दैवाने तेच घडत आहे, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस स्टेशनला जाण्याऐवजी दिल्लीला गेले असते, तर तेथून महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठी मदत झाली असती. मात्र ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तो कंपनीवाला त्यांचा कार्यकर्ता आहे. म्हणून विरोधी पक्षनेत्यांनी पोलीस ठाण्यात जाणे योग्य नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी काल रात्री दमण येथील ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर रात्री पोलिस ठाण्यात गेले. तेथे जात त्यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवर आक्षेप घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचीही टीका..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात तुटवडा निर्माण झालेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या एका साठेबाजाला वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी दोन विरोधी पक्षनेते आणि दोन आमदार स्वत: पोलीस ठाण्यामध्ये जातात. त्यांच्या या जाण्यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा महाराष्ट्राला मिळू नये यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केला आहे.

Visits: 24 Today: 1 Total: 118391

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *