गणेश विसर्जन व पैगंबर जयंतीचा जुलूस एकाच दिवशी! प्रशासनासमोर मोठा पेच; जिल्हा पोलीस अधीक्षकांची शिष्टाई फळाला येणार?..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राच्या पारंपरिक उत्सवात गणेशोत्सवाचे मोठे महत्त्व आहे. राज्याच्या घराघरात आणि कोनाकोपर्यात साजर्या होणार्या या उत्सवाला यंदा १९ सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. मात्र उत्सवाच्या दहाव्या दिवशी गणेश विसर्जन आणि मुस्लिम धर्मियांमध्ये अतिशय पवित्र मानला जाणारा ईद-ए-मिलाद (प्रेषित मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिवस) एकाच दिवशी येत असल्याने प्रशासनासमोर नवा पेच उभा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही ठिकाणांसह अहमदनगर शहरातील मुस्लिमांनी पुढाकार घेत विसर्जनाच्या दिवशी जुलूस न काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र संगमनेर शहरात अद्यापही असा निर्णय झाला नसल्याने प्रशासनासमोर आजही यक्षप्रश्न उभा असून गुरुवारी शांतता समितीच्या बैठकीसाठी संगमनेरात येणार्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची शिष्टाई फळाला येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संगमनेरच्या सार्वजनिक गणेश उत्सवाला मोठी परंपरा आहे. सन १८९५ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेतून संगमनेरातील सोमेश्वर मंदिरात (रंगारगल्ली) पहिल्यांदा सार्वजनिक गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतरच्या कालावधीत शहरातील चौंडेश्वरी मंदिर (मेनरोड), लक्ष्मीनारायण मंदिर (कॅ. लक्ष्मी चौक), मेनरोडवरील बालाजी मंदिर, चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिर, नेहरु चौकातील तट्ट्या मारुती मंदिर, माळीवाड्यातील मारुती मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा उत्सव साजरा होवू लागला. स्वातंत्र्यपूर्व काळात या उत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याला बळ देण्याचे काम झाले. मात्र स्वातंत्र्यानंतर हा उत्सव केवळ एक परंपरा म्हणून कायम राहिल्याने त्याचे स्वरुप बदलत गेले.
यापूर्वी गणेशोत्सवा दरम्यान मुस्लिम धर्मियांचेही उत्सव साजरे झाले आहेत. यंदा पुरुषोत्तम मासामुळे सण-उत्सवांच्या तारखा पुढे-मागे झाल्या आहेत. मात्र यापूर्वी गणेशोत्सवा दरम्यान सातव्या दिवशी मुस्लिम धर्मियांचा मोहरम हा सण दरवर्षी साजरा झाला आहे. खरेतर जिल्ह्यातील गणेशोत्सवात शेवटचे तीनच दिवसच देखावे पाहण्यासाठी खुले करण्याची पद्धत आहे. त्यानुसार उत्सव सुरु झाल्यानंतर सातव्या दिवशी सार्वजनिक मंडळांकडून आपापले देखावे खुले केले जातात. मात्र बहुतेकवेळा त्याच दिवशी मुस्लिम धर्मियांचा मोहरम सण येत असल्याने व त्यानिमित्ताने ताजीयाचे जुलूसही काढले जात असल्याने संगमनेरात जातीय सौहार्दाचेही दर्शन घडले आहे. अशावेळी त्या-त्या वर्षी सार्वजनिक मंडळांनीही आपले देखावे दुसर्या दिवशी खुले करुन जातीय एकतेचे उदाहरण प्रस्तूत केले आहे.
यावर्षी मात्र मोहरमचा सण होवून गेला असून गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मुस्लिम धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र मानला गेलेला ईद-ए-मिलादचा सण येत आहे. मान्यतेनुसार याच दिवशी प्रेषित मोहंमद पैगंबर यांचा जन्म झाल्याचे मानले जाते. त्यामुळे ईदचा हा दिवस मुस्लिम बांधवांसाठीही अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा असल्याचे समजले जाते. यादिवशी जगभरातील मुस्लिम धर्मिय ठिकठिकाणी एकत्रित होवून जुलूसही (मिरवणूक) काढतात. संगमनेरातून निघणार्या या जुलूसचा बहुतेक मार्गही विसर्जन मिरवणुकीसाठी वापरात असलेलाच आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
सन २००३ साली सोमेश्वर रंगारगल्ली मंडळाचा मानाचा गणपती जागेवरुन पुढे सरकल्यानंतरही त्याच्या मार्गावर अन्य मंडळांचे गणपती असल्याचे समोर आले होते. त्यातून मानाच्या गणपतीचा अवमान झाल्याचे सांगत मंडळाने त्यावर्षी मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यावेळच्या जिल्हाधिकार्यांनी पहाटेच्या सुमारास संगमनेरात येवून मानाच्या गणपतीची माफी मागितली व भाविष्यात पुन्हा असा प्रसंग निर्माण होणार नाही अशी ग्वाहीही कार्यकर्त्यांना दिली. त्यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच मानाच्या गणरायाचे मिरवणुकीशिवाय जागेवरच विसर्जन करण्यात आले होते.
त्यातून बोध घेवून प्रशासनाने २००४ सालापासून संगमनेरच्या मुख्य मिरवणुकीचा मार्ग केवळ मानाच्या गणपतींसाठी राखीव केला. पूर्वी दुपारी चार वाजता मुख्य मिरवणुकीला सुरुवात होत असतं, पण तेव्हापासून त्यात बदल करुन सकाळी ८ वाजताच मुख्य मिरवणुकीला सुरुवात होवू लागली. २००३ सालचा ‘तो’ प्रसंग नकोच म्हणून पोलिसांकडूनही विसर्जनाच्या आदल्या दिवशी रात्री मुख्य मिरवणुक मार्गाला जोडले जाणारे सर्व छोटे-मोठे रस्ते सील केले जातात. त्यामुळे पोलिसांच्या संमतीशिवाय या मार्गावर कोणत्याही गणेश मंडळाचा प्रवेश बंद करण्यात आला. १९ वर्षांपूर्वी सुरु झालेली ही पद्धत आजही कायम असल्याने विसर्जनापूर्वी गवंडीपुरा ते महात्मा फुले चौकापर्यंत मेनरोडला जोडणारे सर्व रस्ते सील होणार आहेत.
अशावेळी मुख्य मिरवणुकीत नसलेल्या मात्र विसर्जनासाठी निघालेल्या मंडळांसाठी महात्मा फुले चौकातून वाल्मिक चौक, चव्हाणपुरा अथवा रंगारगल्ली मार्गे प्रवरा नदी असा मार्ग दिवसभर खुला असतो व त्यावरुन दिवसभर मिरवणुकाही सुरुच असतात. तर, मानाचा राजस्थान युवक मंडळाचा गणपती लालबहादूर शास्त्री चौकातून वाजतगाजत बाजार पेठेतून जावून तेलीखुंटावर मुख्य मिरवणुकीत सहभागी होतो. या मंडळाचा गणपती पुढे सरकल्यानंतर त्या पाठोपाठ स्वामी विवेकानंद मंडळाचा मानाचा गणपती व त्या मागे फेमस मित्रमंडळ, बाजारपेठ व्यापारी मंडळ व वाल्मिक मंडळाचे गणपतीही मुख्य मिरवणुकीत सहभागी होत असतात.
याशिवाय चौंडेश्वरी मंडळ, महात्मा फुले मंडळाचे गणपती नेहरु उद्यान, मोमीनपुरा, जुने पोस्ट ऑफीस, नवघर गल्ली या मार्गाने जावून गवंडीपुरा मशिदीजवळ मुख्य मिरवणुकीत सहभागी होतात. थोडक्यात गवंडीपुरा ते माळीवाडा हा मार्ग मुख्य मिरवणुकीचा मार्ग म्हणून बंदिस्त असला तरीही त्यासोबत बाजारपेठ आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते गवंडीपुरा मशिद या दोन्ही मार्गांवर मिरवणुकीच्या दिशेने निघालेल्या मानाच्या मंडळांसह अन्य गणेश मंडळांचेही गणपती असतात. त्यामुळे या तीनही मार्गावर सकाळपासूनच गणपती, मिरवणुकीतील वाहने, वाद्य मंडळी व कार्यकर्त्यांची मोठी रेलचेल असते.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने निघणार्या जुलूसचा बहुतेक मार्गही विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरच असल्याने यंदा मात्र प्रशासनासमोर मोठा पेच उभा राहिला आहे. त्यामुळे मुस्लिम धर्मियांनी ईदचा जुलूस दुसर्या दिवशी काढावा यासाठी स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत, मात्र त्यात अद्याप यश आलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर उद्या (ता.१४) जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेरात शांतता समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर ते संगमनेरातील मुस्लिम समाजातील मान्यवरांशी चर्चा करुन यावर तोडगा काढणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या शिष्टाईनेच हा पेच सुटणार असल्याचे बोलले जात आहे.