चोरी करताना हाती काहीच लागले नाही म्हणून लावली आग! श्रीरामपूर शहरातील प्रकार: आगीत सात लाख रुपयांचे नुकसान

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील जुने तार कार्यालयाजवळच असलेल्या एका बुक स्टॉलच्या गोडावूनमध्ये काही चोर चोरी करण्यासाठी आले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही म्हणून त्यांनी गोडावूनला आग लावून निघून गेले. परिसरातील आणखी एका ठिकाणी चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या आगीत सुमारे 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

श्रीरामपूर शहरातील स्टेट बँक चौक, कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये यश संतोष अग्रवाल यांचे वह्या, पुस्तके, स्टेशनरीचे दुकान असून या मालाचे गोडावून तेथून जवळच असलेल्या जुने तार कार्यालय शेजारीच आहे. या गोडावूनमध्ये वह्या, पुस्तके व स्टेशनरी असा 40 ते 50 लाख रुपयांचा माल असहे. अज्ञात चोरट्यांनी या गोडावूनच्या दरवाजाची कडीकोयंडा, कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला. याठिकाणी केवळ वह्या, पुस्तके असा माल असल्यामुळे त्यांना नेण्यासारखे काहीच नसल्याने चिडलेल्या चोरट्यांनी आग लावून पलायन केले.

सदर आग लागल्याची माहिती गोडावून शेजारी राहत असलेल्या दराडे यांनी मोबाईलवरुन दिली. तातडीने अग्रवाल घटनास्थळी आले. काहींनी नगरपरिषदेच्या अग्निशमन बंब बोलाविला होता. त्याठिकाणी असलेल्या एका खोलीतील माल जळून खाक झाला. तर अन्य खोल्यांमधील माल आगीपासून बचावला असला तरी आग विझविण्यासाठी आलेल्या पाण्यामुळे अन्य खोल्यांमधील मालही पाण्यामुळे खराब झाला आहे. आगीत सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले असून पाण्यामुळे 1 ते 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या आगीची माहिती मिळताच पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन सर्व माहिती घेतली. याप्रकरणी शहर पोलिसांनी यश संतोष अग्रवाल यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर 306/2022 प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंवि कलम 448, 436 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 29630

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *