संगमनेरात कोविडचा कहर; तब्बल तिनशे जणांचे अहवाल पॉझिटिव्ह! वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांची पुन्हा संगमनेरात धाव..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यात कोविड संक्रमणाने अक्षरशः कहर केला असून रोजच्या प्रचंड रुग्णसंख्येमुळे संपूर्ण जिल्ह्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. आजही जिल्ह्यात 3 हजार 229 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील तब्बल 742, संगमनेर तालुक्यातील 296, नगर ग्रामीणमधील 255 तर अकोले तालुक्यातील 199 जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण संख्या आता 1 लाख 39 हजार 358 झाली असून संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या बारा हजारांचा आकडा ओलांडून 12 हजार 278 वर पोहोचली आहे. आजच्या रुग्णसंख्येत शहरातील 51, ग्रामीणभागातील तब्बल 240 तर अन्य तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही आता 1 हजार 874 झाली असून आज अवघ्या 138 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तालुक्यातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी संगमनेरात धाव घेतली असून आढावा बैठक सुरु आहे.


एकीकडे जिल्ह्यातील कोविड संक्रमणाने गती घेतलेली असतांना दुसरीकडे रुग्णालयांमध्ये खाटांचा तुटवडा निर्माण झाला असून ठिकठिकाणी कोविड सेंटर्स उभी केली जात आहेत. संगमनेरातही स.म.थोरात कारखान्याच्यावतीने 500 खाटांचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले असून जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही त्यादृष्टीने तयारी सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे रेमडेसिवीर व ऑक्सिजन या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींसाठीही संघर्ष कायम असून अजूनही या दोन्ही गोष्टींचा पुरवठा सुरळीत होवू शकलेला नाही. त्यामुळे बाधित झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची रुग्णालयात खाट, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर मिळविण्यासाठी धावपळ अजूनही सुरुच असल्याचे चित्र सध्या संपूर्ण जिल्ह्यात दृष्टीस पडत आहे.


आजही जिल्ह्यात उच्चांकी रुग्णवाढ झाल्याचे प्राप्त अहवालातून समोर आले आहे. आज शासकीय प्रयोगशाळेच्या 1 हजार 49, खासगी प्रयोगशाळेचे 916 व रॅपीड अँटीजेनद्वारा 1 हजार 264 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 742, संगमनेर तालुक्यातील 296, नगर ग्रामीणमधील 255, कर्जत व शेवगाव तालुक्यातील प्रत्येकी 213, राहाता तालुक्यातील 207, अकोले तालुक्यातील 199, कोपरगाव तालुक्यातील 182, पारनेर तालुक्यातील 135, भिंगारच्या लश्करी परिसरातील 126, श्रीगोंदा तालुक्यातील 122, श्रीरामपूर तालुक्यातील 114, नेवासा तालुक्यातील 113, राहुरी तालुक्यातील 104, पाथर्डी तालुक्यातील 90, इतर जिल्ह्यातील 50, जामखेड तालुक्यातील 45 व लष्करी रुग्णालयातील 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.


संगमनेर व अकोले तालुक्यात आज समोर आलेल्या रुग्णसंख्येने गेल्या 13 महिन्यातील सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. संगमनेर तालुक्यातून आज तब्बल 296 रुग्ण समोर आले. त्यातही तालुक्यातील ग्रामीणभागात कोविडचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळाले. आज शहरातील अवघ्या 51 तर ग्रामीणभागातील तब्बल 240 जणांचा कोविडची लागण झाल्याचे समोर आले. तर अकोले तालुक्यातून 199 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या उपलब्ध आरोग्य सुविधांपेक्षा कितीतरी अधिक म्हणजे तब्बल 1 हजार 874 वर पोहोचली आहे.

एकीकडे आज 296 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले असतांना दुसरीकडे उपचार पूर्ण करुन घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अवघी 138 आहे. यावरुन परिस्थितीचे गांभिर्य लक्षात येत असून नागरिकांनी ‘कठोर निर्बंधां’चे तंतोतंत पालन करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील आज दुपारनंतर संगमनेरात दाखल झाले असून संभाव्य परिस्थितीबाबत अधिकार्‍यांसमवेत ते बैठक घेत आहेत.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी आजच्या संगमनेर भेटीदरम्यान संपूर्ण शहरातून फेरफटका मारीत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नवीन नगर रस्त्यावरील धन्वंतरी रुग्णालयाला अचानक भेट देत तेथे उपचार घेणार्‍या रुग्णांशी संवाद साधला. उपचार कसे मिळतात? औषधे येथेच मिळतात की आणावी लागतात? जास्त पैसे घेतले जातात का? असे प्रश्‍न विचारतांना त्यांनी डॉक्टरांशीही चर्चा केली. परतीच्या मार्गात नवीन नगर रस्त्यावरील एका मेडिकलजवळ थांबून त्यांनी तेथे होणारी गर्दी आणि केवळ नियम म्हणून आखलेल्या सामाजिक अंतराच्या चौकोनावरुन संबंधित मेडिकल चालकाला तंबीही दिली.

Visits: 89 Today: 1 Total: 1110604

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *