‘टीईटी’ परीक्षेपेक्षाही शिक्षक भरतीत मोठा घोटाळा! अहमदनगर जिल्ह्यात करोडोंची उलाढाल; जालिंदर वाकचौरेंचा आरोप

नायक वृत्तसेवा, अकोले
टीईटी परीक्षेपेक्षाही अहमदनगर जिल्ह्यात शिक्षक भरतीत मोठा घोटाळा होऊन करोडोंची उलाढाल झाली असल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वाकचौरे यांनी म्हंटले आहे की, सध्या टीईटी परीक्षेचा घोटाळा गाजतो आहे. परंतु यापेक्षाही मोठा शिक्षक भरती घोटाळा महाराष्ट्रात झाला आहे. पण दुर्दैवाने त्याची चर्चा झाली नाही. टीईटी पास नसलेले हजारो शिक्षक सेवेत घेण्यात आले आहेत. टीईटीची अट 2013 साली लागू झाली व 2013 साली शिक्षक भरती बंद झाली. यातून पळवाट काढत हे शिक्षक 2012 पूर्वी आमच्या शाळेत काम करत होते, असे रेकॉर्ड तयार करून अधिकार्यांना पैसे देऊन शिक्षकांना मान्यता मिळवल्या. त्यानंतर हजारो शिक्षक सेवेत रुजू केले आहेत, असे प्रत्येक जिल्ह्यात 500 पेक्षा जास्त शिक्षक आहेत. या घोटाळ्याची पद्धत अशी की शिक्षकांच्या सह्या असलेले हजेरी पुस्तक 2012 पूर्वीपासून दाखवायचे आणि ते शिक्षक 2012 पासून नोकरीत होते; त्यामुळे ते शिक्षक भरतीपूर्वी कामाला होते असे रेकॉर्ड तयार करायचे. त्याला शिक्षणाधिकार्यांची मान्यता मिळवली. याला मंत्रालय स्तरावरून मान्यता दिल्या गेल्या व हे शिक्षक नववी व दहावीला शिकवत होते असे दाखवून टीईटीतून सूट मिळवून घेतली (टीईटी आठवीपर्यंत असते). म्हणजे टीईटी पास होण्याचीही किंमत वसूल केली व टीईटी लागू नसण्याचेही पैसे वसूल करण्यात आले. त्यानंतर या शिक्षकांना शालार्थ आयडी देण्यासाठी स्वतंत्र पैसे घेतले गेले आणि पगार सुरू करण्यासाठी पैसे घेतले.

त्यानंतर त्यांच्या पूर्वीपासून नोकरीत जाते म्हणून लाखो रुपयांच्या पगाराचे फरकही काढण्यात आले, त्यातही अधिकार्यांनी टक्केवारी घेतली. गरीब कुटुंबातील अनेक तरुण शिक्षक यात भरडले गेले असून त्यांना जिल्हा शिक्षणाधिकारी ते मंत्रालय असा किमान 15 लाखांपर्यंत खर्च आला आहे. शिक्षण संस्थेने घेतलेले पैसे पुन्हा वेगळेच, जवळपास 20 ते 25 लाख रुपये देऊन या नोकर्या मिळाल्या आहेत. यातील अनेक शिक्षकांनी कर्ज काढले आहे. ते कर्जबाजारी झाले आहेत. हा घोटाळा इतका व्यापक आहे की प्रत्येक जिल्ह्यात ही संख्या किमान 500 ते 1000 असावी असा अंदाज आहे. इतके शिक्षक गुणिले किमान 10 लाख धरले तरी या घोटाळ्याचा अंदाज येईल. हा घोटाळा कदाचित टीईटीलाही मागे टाकू शकेल, अशी शक्यता वाकचौरे यांनी व्यक्त केली आहे.

सदर घोटाळा उघड करण्याचा सोपा मार्ग म्हणजे 2012 नंतर शिक्षक भरती बंद असताना 2012 नंतर जिल्ह्यात नवे शिक्षक किती भरती झाले ही संख्या घेतली की हा घोटाळा उघड होतो. त्याकाळात अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असताना व शिक्षक भरती बंद असतानाही शिक्षक भरती झाली कशी? टीईटी पास नसताना हे शिक्षक या व्यवस्थेत कसे आले? हा प्रश्न अधिकार्यांना विचारायला हवा.
