विनाकारण फिरणार्‍यांची अँटीजेन टेस्ट करणार! नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांचा इशारा

नायक वृत्तसेवा, नेवासा
शहरात विनाकारण फिरणार्‍यांवर अँटीजेन टेस्टची कारवाई करणार असल्याचा इशारा नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे. याबाबत तहसीलदार, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाचा निर्णय झाला असून दोन रुग्णवाहिका उपलब्ध होताच ही कार्यवाही करण्यात येणार असून यामध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधित व्यक्तीला कोविड सेंटरला दाखल करणार असल्याचेही करे यांनी स्पष्ट केले आहे.


या प्रसिद्धी पत्रकातून अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक विजय करे म्हणाले, तालुका प्रशासनाकडून तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी व सर्व विभाग प्रमुख यांच्याकडून लॉकडाऊन कडक करण्यासाठी निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये नाकाबंदीवेळी वाहतूक शाखा व संबंधित विभाग यांच्या मार्फत तहसीलदारांकडून दोन पर्यायी खासगी तत्त्वावरील रुग्णवाहिकांची व्यवस्था होताच विनाकारण रस्त्यावर फिरणारे जे नागरिक आहेत त्यांना नाकाबंदी दरम्यान थांबवून जागेवरच अँटीजेन टेस्ट करायची व ते पॉझिटिव्ह मिळून येताच त्यांना तत्काळ सदर रुग्णवाहिकेमधून कोविड केअर सेंटरला हलवायचे. त्यानंतर तशी माहिती फक्त त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला असल्याचे करे म्हणाले आहेत.

यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांना संचार करण्याचा मोह आवरावा लागेल. जे लोक स्वतः पॉझिटिव्ह आहेत; परंतु त्यांना कमी प्रमाणात त्रास होत आहे किंवा त्रास होत नाहीये असे लोक हे समाजामध्ये सर्वात जास्त कोरोनाचा प्रसार करू शकतात अशी एकंदरीत बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली आहे. त्यावरून वरिष्ठांच्या निर्देशानुसार व तालुका प्रशासन पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही करे यांनी जनतेला केले आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 27401

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *