लोणीमध्ये हॉटेलच्या खोलीत महिलेची निर्घृण हत्या! राहाता तालुक्यात उडाली खळबळ; एक संशयित ताब्यात

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील लोणी गावात 59 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लोणी पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

अंजना मोहिते असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. मूळची केडगावची रहिवासी असलेली अंजना लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलसमोर समोर असलेल्या हॉटेल पाकिजा येथे गेल्या 15 वर्षांपासून कामाला होती. हॉटेलमधील एका छोट्याशा खोलीत ती वास्तव्यास होती. हॉटेल मालक सकाळी आठ वाजता हॉटेलवर आले असता त्यांनी अंजनाला आवाज दिला. मात्र, तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी तिच्या खोलीच्या दिशेने जाऊन पाहिले असता खोलीचा दरवाजा उघडा दिसला. आत डोकावले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाकिजा यांचा मृतदेह आढळून आला. हे दृश्य पाहून हॉटेल मालकाला धक्काच बसला.


त्यांनी याबाबत लोणी पोलिसांना कळवले असता पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. डोक्यात दगड घालून अंजनाचा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अज्ञात आरोपी विरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फॉरेन्सिक पथकाच्या साहाय्याने धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या महिलेची हत्या कुणी व का केली असा प्रश्न निर्माण झाला असून, घटनेने राहाता तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 90 Today: 2 Total: 1105572

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *