पोलिसांच्या दुर्लक्षामुळे समशेरपूर बनतेय अवैध धंद्यांचे केंद्र नागरिकांची थेट जिल्हा पोलीस प्रमुखांकडे कारवाईची मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील समशेरपूर परिसरात सध्या खुलेआमपणे अवैधरित्या दारुविक्री, मटका सुरू असून पोलीस जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हे अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करावेत अशी मागणी होत आहे.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने 2002 ला दारुबंदी करण्यात आलेली आहे. यासाठी सनदशीर मार्गाने मोठे आंदोलन उभारून महिलांच्या मतदान प्रक्रियेने दारुबंदी झाली होती. काही काळ दारुबंदी अंमलात आली. परंतु काही लोक पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे दारुची अवैधरित्या विक्री करत आहेत. समशेरपूर फाटा परिसरात तसेच प्रमुख रस्त्यांवर असलेल्या ढाब्यांवर आणि गल्लीबोळात सहजपणे दारु मिळतेय. दारुविक्री कोठे चालते, कोण करते याची सर्व माहिती स्थानिक पोलिसांना आहे. परंतु पोलिसांच्या अर्थपूर्ण तडजोडीतून हे दारुविक्री सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहे.
याबरोबरच समशेरपूर पोलीस दूरक्षेत्रापासून शंभर ते दीडशे फुटांवर राजरोसपणे मटका अड्डे सुरू आहेत. अकोलेतील व्यक्ती हा मटका अड्डा चालवत असल्याची चर्चा आहे. याशिवाय हा एकच मटक्याचा अड्डा नसून तीन अड्डे बिनबोभाटपणे सुरू आहे. अड्डे चालविण्यासाठी जास्तीचे भाडे देऊन हे अवैध धंदेचालक जागा भाड्याने घेतात. त्यानंतर स्थानिक नागरिकांचीच अड्डे चालविण्यासाठी पगारावर नेमणूक करतात. कधी धाड टाकली तर काही अंतरावर नेऊन आरोपीस सोडून दिले जाते. मग काही तासांसाठी मटका पेढी बंद केली जाते. परंतु काही वेळातच हे पुन्हा सुरू होते. विशेष म्हणजे धाड टाकल्यानंतर अवैध धंदे सुरू असणार्यांवर कारवाई न करता एखाद्या व्यक्तीला पैशाचे आमिष दाखवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. पुढे खटला चालूपर्यंत त्याला पैसे पुरविले जाते अशीही नागरिकांत चर्चा आहे. त्यामुळे तरुणाई व्यसनाधीन होवून गुन्हेगारी देखील वाढत आहे. यावर वेळीच पायबंद बसावा म्हणून थेट जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनीच कारवाई करुन कायमस्वरुपी अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
समशेरपूर परिसरासह वीरगाव फाटा, धामोडी फाटा आणि इंदोरी फाटा येथेही अवैधरित्या दारुविक्री होते. मात्र, स्थानिक पोलिसांना याची संपूर्ण माहिती असतानाही केवळ आर्थिक तडजोडीमुळे कारवाई होत नसल्याची भावना या परिसरांतील नागरिकांत आहे. त्यामुळे याठिकाणांवर देखील कारवाई करुन कायमस्वरुपी अवैध दारुविक्री बंद करण्याची गरज आहे.